एक गझल_गोविंद नाईककळेना का जुगारी एवढे धास्तावले होते;
पणाला दु:ख जेंव्हा मी जरासे लावले होते.

तिच्या बाहूत शिरल्यावर मनाला प्रश्न हा पडला;
कसे झुळुकेत वादळ एक अख्खे मावले होते.

तुला भेटून आता वाटते घर एक बांधावे;
जरी आयुष्य मी रस्त्यावरी भिरकावले होते.

खरा तू कोणता;बाहेरचा की आतला माझ्या?
विचाराने मला या सारखे भंडावले होते.

अचानक चेह-यावरचा पदर ढळताच वा-याने;
जरासे होइना का पौर्णिमेचे फावले होते.

ज़रा तू दूर जाता मांडला उच्छाद बघ यांनी;
व्यथे तुझियामुळे अश्रू किती लाडावले होते.

असे हरवून मन गेले;पुन्हा मज भेटले नाही;
कुणाचे श्वास ते माझ्या उरी डोकावले होते.

पुन्हा येशील तेंव्हा ये तुझी बदलून तू गीता;
अरे निष्पाप डोळेही 'तिथे' पाणावले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा