एक गझल_रवीप्रकाश





प्याला


नुसताच बैसलो मी हाती धरून प्याला;
रडणे महाग पडले गेला भरून प्याला.


ग्रीष्मात हाय कैसे दाटून मेघ आले...
धुंदी चढे ऋतुंना माझा बघून प्याला.

देहात टंच मस्ती...डोळ्यात मद्यशाला;
माझ्याच प्रेयसीला बघतो जळून प्याला.

शुद्धीत राहण्याचा सारा अहम गळाला;
तो बोललाच ऐसा हाती धरून प्याला.

सांगा तुम्ही मला हो कैफात कोण नाही?
बदनाम व्यर्थ झाला इच्छा नसून प्याला.

सारे ऋतू अभागी मज मागती खुमारी;
सांगा कुणाकुणाला द्यावा भरून प्याला?

मदमस्त आसवांची चाखा जरा खुमारी;
घ्याना जरा सुखांनो... अश्रू भरून प्याला.

चिंताच माणसाला बसवे चितेवरी हो;
कसला विचार करता घ्याना भरून प्याला.

जर सोमरस मुखाला लावाल रामप्रहरी;
उठवेल मध्यरात्री मग खडबडून प्याला.

जळले समुद्र साती विझली न आग माझी;
चांडाळ पाजती मज विस्तव भरून प्याला.

स्वप्नात देव मजला ‘छोटा  रिचार्ज’ मागे;
देवास पाजला मी उष्टा करून प्याला.

गंगा पवित्र झाली ऐकून शब्द सुंदर-
“मी माळ घातली रे" म्हणतो हसून प्याला.

चषकात थंड झाले ज्वालामुखी हजारो;
तृष्णे मध्ये  स्वतःच्या जळतो अजून प्याला.

किंकाळते तृषा ही अतृप्त जन्म गेला;
मद्यास आग लागो;जावो जळून प्याला.

पुष्पांजली विचारे हा गंध रे कुणाचा?
गंधाळतो बघा ना कष्टाधून प्याला.

कैफात हाय कुठल्या मृत्यूस चुंबिले मी;
मोडून डाव गेला अर्ध्यामधून प्याला.

गंगा पवित्र करण्या नवोजना निघाली-
विसळू चला विधीवत गंगेमधून प्याला.

माझाच हाय मजसी संवाद होत नाही;
मध्यस्थ ठेवला मी हल्ली म्हणून प्याला!

टाहो कफल्लकांचा गगनात लुप्त झाला...
अन सांडला धरेवर स्वर्गामधून प्याला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा