१.
चंद्र हा दारी तुझ्या का थांबलेला आजही;
नीज त्याची हरवलेली;जागलेला आजही.
अंगणी प्राजक्त सार्या श्वासही गंधाळती;
चांदण्यांना का पहारा घातलेला आजही?
जे हवे ते विसरण्याचे वर मिळालेले तुला;
सांग मी का आठवांनी शापलेला आजही.
पावले का थांबती ही वाट येता ती जुनी;
ठेच जागी..घाव तो ओलावलेला आजही.
नित्य चाले क्रम ऋतूंचे एक सरता एक ये;
ग्रीष्म आयुष्यात का रेंगाळलेला आजही.
तोच रस्ता,तोच मीही,तीच आहे जिंदगी
घास दु:खाचा चवीला वाढलेला आजही.
वाहिल्या कित्येक शपथा आणि वचने मोडली;
अक्षरांचा गाव मागे कोरलेला आजही.
सापडेना मी स्वतःला;हरवलो डोळ्यात या;
गंध निशिगंधातला तू चोरलेला आजही.
थरथरारे श्वास सुद्धा हाक येता गोड ती;
भ्रमर मी अन मोगर्याला भाळलेला आजही.
२.
भावनांचा रंग खोटा फासलेले चेहरे;
यंत्र हे आयुष्य आणिक..छापलेले चेहरे.
कोणता प्याला विषाचा ना कळे हृदया वसे;
डंख ते लपवून सारे भेटलेले चेहरे.
सर्व ते अधिकार देवा घेतले यांनी तुझे;
तू दिलेल्या चेहर्याला गाडलेले चेहरे.
जीवनी आनंद घेण्या धाडले ना तू इथे?
त्याच जगण्याच्या व्यथांनी घेरलेले चेहरे.
रंगमंची रंगला हा खेळ पात्रांचा असा;
अभिनयाचे घेत बुरखे झाकलेले चेहरे.
झापडे पावित्र्यतेची ओढलेली नेहमी;
स्पर्श डोळा वासनांचा;बाटलेले चेहरे.
३.
आठवांचा पसारा...पुन्हा एकदा;
वेदनांना धुमारा... पुन्हा एकदा.
जाहला का तुझा स्पर्श मज सांग ना;
कातळाला शहारा...पुन्हा एकदा.
दे निखाऱ्यास फुंकर जराशी तुझी;
गारठ्याला उबारा...पुन्हा एकदा.
सांत्वने ती पुरे फक्त डोळ्यातली;
काळजाला सहारा...पुन्हा एकदा.
ध्वस्त आतून झालो कितीदा तरी;
वादळाला निवारा...पुन्हा एकदा.
दाटल्या खूप भरती तळाशी अता;
आसवांना किनारा...पुन्हा एकदा.
स्वैर गंधाळतो मोगरा तो म्हणे?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा