एक गझल_रमेश सरकटे





घासातले तुला मी भरवीन घास माझे;
आंदण तुलाच बाळे देईन श्वास माझे.

तोरण तुझ्याच दारी बांधीन मी सुखाचे;
ओटीत सौख्य देण्या असती प्रयास माझे.

समजू नकोस अबला मी बोट सोडताना;
आधार सोबतीला असतील भास माझे.

माहेर आणि सासर उजळून टाकण्याचे;
देतो सदैव तुजला उपदेश खास माझे.

लावू नकोस बट्टा नावास तू ग माझ्या;
आहेत जिंदगीभर हृदयात ध्यास माझे. 


     < <<----Back to INDEX <<<----अनुक्रमणिका <<<----





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा