ते तिला कळणार नव्हते चांदणे, सांगून मी;
फ़ारसा उपयोग नव्हता मग तिथे थांबून मी.
थांबली नाही कधीही तू दिलेली पानगळ;
पाहणेही सोडले खिडक्या पुन्हा उघडून मी.
आजही त्याच्या घरी ती एकटी रेंगाळते;
का जवळ करतो कुणाला एवढ्या लांबून मी ?..
तू पुन्हा येशील हा अंदाज नव्हता बांधला
मग पुढे गेलोच नसतो वाट ओलांडून मी.
मी तुझेही राज्य माझ्यावर स्वतःहुन घ्यायचो;
एक धप्प्याला कितीदा जायचो जवळून मी.
चेह-याच्या आजही चिंध्याच दाखवतोय तो;
जोडला होता कितीदा आरसा फ़ोडून मी.
त्याच का आवर्तनाला थांबली मैफ़िल तुझी?
ज्या समेवर ठेवलेला हुंदका राखून मी!
जोडली नव्हती कधीही सांत्वनाला माणसे;
खूपदा रडलो इथे झाडास कवटाळून मी.
२.
जर दुःखाचे लक्षण नसते;
आज इथे इतकेजण नसते.
आम्ही सगळे वनवासी पण;
सगळ्यांचे रामायण नसते.
मी गुलमोहर झालो कारण;
सगळी हिरवळ श्रावण नसते.
ओठांनी पण वाच मला तू;
नजरेने पारायण नसते.
माणुस झाडांना वापरतो;
झाडांचे आमंत्रण नसते.
पक्षांचीही शाळा भरते;
डिग्री म्हणजे शिक्षण नसते.
देव जगाची रक्षा करतो;
देवाला तर घर पण नसते.
देवदुतांच्या वाहीन्यांचे;
स्वर्गातुन प्रक्षेपण नसते.
माझा असतो जनरल डब्बा;
कुठलेही आरक्षण नसते.
जंक्शन चुकलेल्या गाड्यांना;
स्टेशनचे आकर्षण नसते.
माणुस त्याचे गाढव करतो;
गाढव तर गाढव पण नसते.
३.
एवढ्या लांबूनही इतके सुचावे;
का तरीही वाटते तू जवळ यावे.
मी तुझ्यावर मांडलेले ठोकताळे;
शक्यतो आत्ताच पडताळून घ्यावे.
रोज डोळ्यांनी मला ओवाळते ती;
काळजावर काजळाचे वळ उठावे.
मी तसेही टाळतो नाजुक फ़ुलांना;
शेवटी अपघातही मजबूत व्हावे.
फ़ार तपशीलात जाणे टाळतो मी;
का तिचे सांगू तुम्हांला बारकावे.
मी कितीदा तोलतो काळीज माझे;
पण तुझ्या वजनात हे केव्हां भरावे.
मग भले झालो तरी चालेल दलदल;
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा