चार गझला_कमलाकर देसले



१.

सांडवा काढू चला

भौतिकाचा केवढा अतिरेक झाला;
पारखा माणूस झाला माणसाला.

कारणाने वा विनाकारण असो, पण-
काळजीचा लाभला वर काळजाला.

देत जाणे, रिक्त होणे या रितीने -
प्रेम करणे फक्त ठावे प्रेमळाला.

पहिलवानाला जयाने लोळवावे;
तोच सांभाळून घेतो निर्बलाला.

रेष ओलांडून जाते 'ती' तरीही-
बोलते दुनिया बिचार्‍या रावणाला.

फेकली छत्री स्वत:हुन तूच राणी;
बोल का तू लावते या पावसाला.

संयमाचे धरण झाले खूप मोठे;
सांडवा काढू चला आता मनाला.


३. 


जीवन म्हणजे

जीवन म्हणजे उठणे पडणे ,रांगत जाणे;
सुख-दु:खाच्या चेंडूला हे झेलत जाणे.

अपुल्यासाठी कर्माचा पुरुषार्थच उत्तम;
वाइट नसते गरजुंसाठी मागत जाणे.

दुसर्‍याच्या मदतीने नभात उडणार्‍याच्या-
हातात उरते डोळ्यादेखत फाटत जाणे.

लोकांताची नशा निराशा वाढविते ,तर-
जमवुन घ्यावे एकांताला वाचत जाणे.

जगून झाले असेल नि:सिम मनापासुनी;
त्याला जमते मरतांनाही नाचत जाणे.

कुणा-कुणाला भेटत जाशिल कुठवर मित्रा;
जमायला तुज हवे स्वत:ला भेटत जाणे.

भितीमुळे ही कार्यमग्नता किती वाढली;
कठीण झाले एकांताला पेलत जाणे.

३.

मनात ज्याच्या स्वर्ग

पडेल कोडे अशी नेहमी वागत असते;
मौनाने तू होकाराला झाकत असते.

दार उघडले माझ्यासाठी कळते तेव्हा;
तुझा चेहरा तुझ्या हातांनी लपवत असते.

शब्दांशिवाय भाव मनातील कळून जातो;
जेव्हा राणी तू डोळ्यांनी बोलत असते.

मनात ज्याच्या स्वर्ग नांदतो सदासर्वदा;
त्याच्यासाठी जहन्नूमही जन्नत असते.

नयेच पळवू घास कुणाच्या तोंडामधला;
उपवाश्याच्या शापामध्ये ताकत असते.

सांभाळावा 'शेप' तिने तो खुशाल आपुला;
आई पण बाळाला रोजच पाजत असते.

प्रेमाच्या प्रांतात भयाला थारा नसतो;
नीतीच्या देशातच भीती नांदत असते.

४.

कदाचित 

पाहिल्याने वाचलो असतो कदाचित;
हासलो, आरासलो असतो कदाचित.

पाहिली असती गझल तू ऐकवूनी;
ऐकतांना भारलो असतो कदाचित.

घ्यायची होती परीक्षा एकदा तू;
पात्र मी तुज वाटलो असतो कदाचित.

तू धरा होवून देती साद मजला;
मेघ होवून सांडलो असतो कदाचित.

जिंकले होते जगाला मी कधीचे;
मी तुझ्याशी हारलो असतो कदाचित.

कातरीची काय होती गरज राणी;
फुंकरीने फाटलो असतो कदाचित.


     < <<----Back to INDEX <<<----अनुक्रमणिका <<<----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा