२७ वर्षांचा सुरेल गझल प्रवास_ माधव डोळे
            एखाद्या तरल गझलचे सूर कानावर पडले की नकळत मन हरवून जाते. गझलचे शब्द व चाल याचा अनोखा संगम गझलमध्ये होतो तेव्हा तर आकाश ठेंगणे होते. गेली अनेक वर्षे विदर्भाच्या अकोल्यातील एक मराठी गायक गझल गायनाच्या क्षेत्रात निष्ठेने काम करतोय. त्याचे नाव आहे दिनेश अर्जुना. हिंदी—उर्दू गझल गायनाच्या अनेक मैफली त्यांनी केल्या आहेत. त्यांचे मूळ नाव आहे दिनेश अर्जुन निंबाळकर.’                                   
          
              `तसा न चंद्र राहीला’ हा त्यांचा मराठी गझलांचा पहिलाच अल्बम नुकताच प्रसिद्ध झाला. मराठीतील ज्येष्ठ गझलकार प्रा. श्रीकृष्ण राऊत यांच्या सात गझला यात आहेत. गेली पंचवीसहून अधिक वर्षे गझल गाणार्‍या अर्जुना यांचा पहिला अल्बम असला तरी त्यातील सर्व चाली रसिकांच्या मनाला भिडणार्‍या आहेत.
सध्या रेकॉर्डिंगचे तंत्र अत्याधुनिक झाले आहे. रोज अनेक अल्बम्स मार्केटमध्ये येतात पण त्यातील गाण्यांचे आयुष्य किती असते हे सर्वांनाच ठाऊक आहे.दिनेश अर्जुना यांच्या अल्बममधील गझला या त्यास अपवाद ठरतील.

या अल्बममधील एका गझलेला दिनेश अर्जुना यांनी तब्बल २७ वर्षांपूर्वी चाल लावली. या गझलचा मतला आहे...


तसा न चंद्र राहिला तशी न रात राहिली

अजूनही तशीच तू तनामनात राहिली 


              या गझलचा किस्सा गमतीदार आहे. अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयात प्रा.श्रीकृष्ण राऊत शिकवित होते. दिनेश अर्जुना हे त्याच कॉलेजचे विद्यार्था. लहानपणापासून गायनाची आवड. शाळेत असतानाच पाठयपुस्तकांतील कवितांना चाली लावून त्या गाण्याचा छंद जडला होता. वडील उत्कृष्ट हार्मोनियम वाजवायचे. त्यामुळे संगीताचे संस्कार घरातूनच मिळाले. कॉलेजमध्ये ते ’गायक दिनेश’ म्हणून लोकप्रिय होते. अकोल्यात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा होती. या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. राऊत सरांच्या घरी जाऊन त्यांनी मराठी गझल मागितली. ती गझल घेऊन ते घरी आले. त्याचे शब्दच एवढे दिलखेचक होते की अतिशय सुरेख चाल लावली. एवढेच नव्हे तर दुसर्‍याच दिवशी सरांच्या घरी जाऊन त्यांना ही चाल ऐकवली. ती ऐकताच राऊत सरांना धक्काच बसला. कारण रदीफ, मतला, अलामत, जमीन या गझलच्या व्याकरणाबाबत फारशी माहिती नसतानाही त्यांनी लावलेली चाल ही शब्दांच्या पलिकडची होती. सरांच्या तोंडून फक्त उद्गार आले.. व्वा क्या बात है... अर्जुना यांनी ही गझल स्पर्धेत गायली तेव्हा सारे सभागृह स्तंभीत झाले. या स्पर्धेत अर्जुना यांना पहिला क्रमांक मिळाला. या कौतुकाच्या थापेनंतर सुरू झाला गझल गायनाचा अनोखा प्रवास.
       
                 पहिल्या गझलला लावलेल्या चालीचा किस्सा सांगताना दिनेश अर्जुना यांच्या डोळयात दिसत होता तो सत्तावीस वर्षांचा धडपडता पण सुरेल प्रवास. ज्या गझलला २७ वर्षांपूर्वी चाल लावली तीच गझल त्यांच्या पहिल्या वहिल्या अल्बममध्ये रसिकांना ऐकायला मिळते. या अल्बममधील आणखी एका गझलचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्या गझलचा मतला असा आहे


तुझ्या हासण्याचे दिवाणे किती
तुझे चाहते कोण जाणे किती


                  या अल्बममधील ही गझल म्हणजे वेगळी अनुभूती.राऊत सरांची ही गझल सर्वांच्या आवडीची तर आहेच. पण अर्जुना यांनी स्वतः संगीतबद्ध करून ती ज्या नजाकतीने गायली आहे त्यास तोड नाही. अर्जुना यांची गझल गायकी ऐकल्यानंतर त्यांच्यातील माणूसपणही तेवढयाच प्रकर्षाने जाणवते. जगण्यातील दुःख, वेदना, अन्याय,गरिबी , प्रेम, विरह या सर्व भावना गझलच्या प्रत्येक शेरातून व्यक्त होतात. पण नेमक्या स्वरांची साथ लाभली तरच अशा दर्जेदार रचना तयार होतात. त्या ऐकताना प्रत्येक स्वर व शब्द काळजाला जखम करतो. अशी भावावस्था होते तेव्हाच खर्‍या अर्थाने गझल जगता येते. ती अवस्था निर्माण करण्याचे शिवधनुष्य दिनेश अर्जुना यांनी लीलया उचलले आहे. हा गझल अल्बम त्यांच्या चाहत्यांनी स्वतः पैसे जमा करून काढला.त्यावरूनच त्यांचे स्वरसामर्थ्य दिसून येते. गझल गायक म्हणून कार्यरत असताना त्यांनी ’अर्धांगीनी’, ’दि रियल लाईफ ऑफ मंडी’, माय हजबन्डस् वाईफ’ या चित्रपटांनाही संगीत दिले आहे.’शुक्रीया’ हा उर्द्ू गझलांचा त्यांचा अल्बमही प्रसिद्ध झाला आहे.त्यांच्या पहिल्या वहिल्या मराठी गझल अल्बमला सुरेल आदाब...कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा