एक गझल_नजीम खान



मी दु:ख मांडताना प्रश्नावलीप्रमाणे;
उत्तर दिले सुखाने मज वाकुलीप्रमाणे.

मजलाच टाळणारे जाती तुझ्या दिशेने;
रे मी उन्हाप्रमाणे,तू सावलीप्रमाणे.

मी बाहुली न आणू शकलो मुलीस माझ्या;
त्याने मुलीस जपले बघ बाहुलीप्रमाणे.

आले कधी न त्यांच्या शब्दांतही निखारे;
ज्यांच्या विवंचनाही विझल्या चुलीप्रमाणे. 

हा एक पाय फसतो,तो एक काढताना;
मज वर्तमान वाटे हा दलदलीप्रमाणे.

ते शोधती बहाणे त्या राजकारणाचे;
घटना घडून जाते पण दंगलीप्रमाणे.


     < <<----Back to INDEX <<<----अनुक्रमणिका <<<----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा