संपादक : श्रीकृष्ण राऊत

अनुक्रम


*************************************

॥ ‘गझलकार’ सीमोल्लंघन १३ ॥

लेख :

गुहर होने तक _गणेश धामोडकर 

गझला :

एक गझल_रमेश सरकटे


मुखपृष्ठ  :  अशोक वानखडे 

*************************************************************************
**************************************************************


ब्लॉगर स्टॅटसनुसार वाचलेली पृष्ठे :
*****

गुहर होने तक _गणेश धामोडकर
गालिबची “ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता,” ही गझल बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. त्या गझलेचा हा मक्ता:

ये मसाईले तसव्वुफ ये तेरा बयान गालिब,
हम तुझे वली समझते जो न बादाख्वार होता

ह्या तुझ्या अध्यात्माच्या गोष्टी, ही तुझी प्रवचनं गालिब – आम्ही तुला संत समजून बसलो असतो, तितका तू दारूडा नसता तर.. हे दारुडेपण अंगात असणं मोठी भाग्याची गोष्ट, अगदी संत होण्यापेक्षाही महत्त्वाची! प्रत्येकालाच कुठे दारूडं होता येतं? किंवा प्रत्येकच जण आपापल्या परीनं थोडाफार दारूडा असत असावा. कुणाला कळतं, कुणाला कळत नाही! तर गालिबला हे त्याचं दारूडेपण पुरतं ठाऊक होतं अन् त्याला त्याचं महत्त्वही कळत होतं, सगळ्यांनाच कुठे तसं दारूडं होता येतं?

खलिल जिब्रानच्या प्रोफेटमधलं एक वाक्य आठवलं.  प्रेमाबद्दल बोलतांना जिब्रान म्हणतो:  Love crowns you so shall it crucify you.  पहिल्यांदाच वाचतांना अंगावर असा काटा आला होता.  ह्म्म, प्रेम जर तुमच्या डोक्यावर मुकुट चढवत आहे, तर ते तुम्हाला crucify करण्यासाठीच आहे याची जाणिव असायला हवी, अन् crucify होण्याची तयारीही असायला हवी. प्रत्येकालाच कुठे crucify व्हायची संधी मिळते? युगायुगांतून एखाद्याच्या डोक्यावर प्रेम असा मुकुट ठेवतं.. युगायुगांतून एखादा असा दारूडा जन्माला येतो.  दारूची लत लागावी तशी प्रीतीची लत लागावी लागते.  कैलाश खेरच्या अंदाजात सांगायचं तर “तेरी दीवानी” व्हायची तयारी असावी लागते, तयारी म्हणण्यापेक्षा तशी दीवानी (दीवानासुद्धा नाही, तुमच्यातल्या पुरुषी अहंकाराची ऐशीतैशी करून) – अगदी दीवानी होण्याची लत लागावी लागते, तेव्हा कुठे हा दारूडेपणाचा ताज डोक्यावर घ्यायची पात्रता हृदयात निर्माण होते.  जिब्रानच्या याच लेखातलं आणखी एक वाक्य आठवतंयः  Love directs your course if it founds you worthy.  यातलं “if it founds you worthy” हे महत्त्वाचं!

चला, विषयांतर बरंच झालं.  पण सध्या असं झालंय की गेल्या तीनचार वर्षात मी एक शब्द धड लिहिला नाहिये, त्यामुळे आता लिहायला बसलोच तर अरेबियन नाईट्ससारखं गोष्टीमधून गोष्ट निघत मी किमान हजार रात्री तरी लिहत बसू शकतो.  ह्म्म, परत विषयांतर… आता मुळ मुद्याकडे जायलाच हवं – गुहर होने तक..

कालच म्हटल्याप्रमाणे “आह को चाहिये एक उम्र असर होने तक” या गझलेतला हा शेर:

दामे हर मौज में है हल्का ए सदकाम ए निहंग
देखें क्या गुजरे है कतरे पे गुहर होने तक

प्रत्येकच लाटेच्या अंतरंगात शेकडो मगरी आ वासून बसल्यायत, बघुया मोती होईपर्यंत आता या थेंबाचं कायकाय होतंय ते! तो स्वातीच्या पावसाचा एक थेंब, अन् त्याचं ते शेकडो मगरींच्या जबड्यातून शिंपल्याची आस धरून जाणं - पण मला हा शेर आवडतो तो त्यातल्या “गुहर होने तक” यामुळे.. हो, तो बिचारा (?) एक स्वातीचा एकटा थेंब अन् त्याचं ते इतक्या संकटांमध्ये पडणं, कायकाय गुजरणार आहे त्याच्यावर त्याचं तोच जाणे, पर शेवटी “गुहर होने तक” हा आशावाद, नव्हे खात्री, तीच त्या थेंबाला सगळ्या संकटांमधून घेऊन जाणार आहे. हे सगळं सहन करायच आहे, पण कधीपर्यंत? तर गुहर होईपर्यंतच.. या गुहर होनेतक ला “शायद”ची कटकट नाही; शेवटी गुहर व्हायचंच आहे…

तर असं हे ब्लॉगचं नाव निघालं… गुहर होने तक.. सध्या एक थेंबच आहे, जातोय मगरींच्या विळख्यातून, मनात “गुहर होने तक” ची धून घेऊन...

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ... गर्भश्रीमंत राग - यमन_सुधाकर कदम

                                                      
                                                           


                                   

यमन रागाच्या नावावर बरेच मतभेद आहेत.काही लोक याला फारसी भाषेतील ’इमन’ चेच यमन मध्ये झालेले रुपांतर मानतात.तसेच हा राग अमीर खुस्रो नावाच्या अल्लाऊद्दीन खिलजीच्या काळातील विद्वान संगीतकाराने प्रचलित केला अशीही मान्यता आहे.एवढे मात्र निश्चित की खुस्रोच्या काळात नव-नवीन राग प्रचारात आलेत.यात फारसी,इराणी सुरावटी भारतीय रागात मिसळल्या गेल्या होत्या.गोपाल नायक हा संगीताचा प्रकांड विद्वान खुस्रोचा समकालीन आहे.दक्षिणेतील पंडीत यमन हा राग ’यमुना कल्याण’चाच एक प्रकार मानतात.या नावाचा उल्लेख दक्षिणेकडील ग्रंथांमध्ये आहे.परंतू यमुना कल्याण आणि यमन यात नावाव्यतिरिक्त काहीच साम्य नाही.उत्तर भारतीय संगीत शास्त्र (भातखंडे कृत) या ग्रंथात हा राग कल्याण थाटातून उत्पन्न झाल्याचे लिहीले आहे.पण त्यातही तथ्य वाटत नाही,हे भातखंडेचा आदर ठेऊन नमूद करतो..(माझे हे विधान अनेकांना आवडणार नाही.)कारण प्राचिन ग्रंथांमध्ये ’यमन’ नावाच्या रागाचा कुठेच उल्लेख केलेला आढळत नाही.तसेच कोण्या एका शब्दावरून राग आला असेल असेही वाटत नाही.कारण राग निर्मिती ही एक प्रक्रीया आहे.ती एकदम होणारी नाही... काही लोक याला यमन कल्याण असेही म्हणतात.पण त्यालाही तसा फारसा अर्थ नाही.यमन रागात विवादी स्वराप्रमाणे कधीतरी कोमल मध्यम लावला की तो यमन कल्याण होतो.याला सुद्धा ग्रंथात आधार नाही.अशा प्रकारे एखादा स्वर बदलून किंवा जास्तीचा लाऊन किंवा विवादी म्हणून एखाद्या स्वराचा प्रयोग करून तो प्रचलित करणे अशी अनेक उदाहरणे आपणास दिसून येतील. ते काहीही असले तरी यमन हा राग अत्यंत लोकप्रिय आहे यात वाद नाही.मी तर त्याला ’गर्भश्रीमंत’ राग म्हणतो.यावर लिहायचे म्ह्टले तर सूर्य,समुद्र,अवकाश,धुमकेतू यावर लिहिण्यासारखे आहे.इतका मोठा आवाका असलेला दुसरा राग माझ्या तरी पाहण्यात आला नाही.तसेच माझ्या मते ’कल्याण’ ऐवजी ’यमन’ हाच थाट असायला हवा होता.यालाच शुद्ध थाट म्हणून मान्यता मिळायला हवी होती.कारण यात सातही स्वर शुद्ध म्हणजे तीव्र आहेत.शुद्ध थाट म्हणविल्या जाणार्‍या बिलावल थाटातील कोमल मध्यम व कोमल निषादाचा वापर विद्यार्थ्यांना विचारात पाडतो.(शास्त्र म्हणून तेच शिकविल्या जात असल्यामुळे यावर कोणी बोलत नाही ,ही गोष्ट वेगळी.तसेच बोलून फायदा काय ? परीक्षेत हेच लिहावे लागणार नाहीतर गूण कमी होतील !)पण यमनच्या बाबतीत असा संभ्रम रहात नाही. शास्त्रीय माहितीः- गेल्या २०० ते २५० वर्षांपासून चालत आलेल्या उत्तर भारतीय संगीत शास्त्रानुसार यमन राग कल्याण थाटातून उत्पन्न झाला आहेवादी स्वर गांधार असून संवादी स्वर निषाद आहे.जाती संपुर्ण असून गानसमय रात्रीचा पहिला प्रहर आहे. गानसमयावर या अगोदरही मी थोडक्यात लिहीले आहे या वेळी मात्र सविस्तर लिहीत आहे.खरे म्हणजे रागाचा गानसमय ठरविण्याची अशी कोणतीच साधने प्राचिन ग्रंथंमध्ये नमूद नाहीत.तरी पण रागाचा गानसमय ठरविल्या गेला आहे.कशाकरीता ? माहित नाही.जिथे प्राचिन ग्रंथातील रागांची नावे व आजच्या रागांच्या नावात साम्य नाही,स्वरात साम्य नाही तिथे गानसमय कसा आणि कोण ठरवणार ? काही तरी शास्त्रीय नियम लावायचे म्हणून लावणे या पलिकडे याला अर्थ नाही.माणसाने केव्हा गुणगुणावे,काय गुणगुणावे हे काय ठरवून होणार काय ? सध्याचा थाट पद्धतीचा विचार केला तर मधुवंतीसारखे राग तर थाट पद्धतीमध्ये बसतच नाही.मग दहा पेक्षा अकरा थाट करून त्या ११व्या थाटाला मधुवंती नाव दिले तर काय बिघडेल ? पण नाही, दहा थाटातच ठोक-पिट करून सर्व राग बसविणे...हे अनैसर्गिक वाटत नाही का ? हिंडोल,गौडसारंग,तोडी,मुलतानी या रागांमध्ये तीव्र मध्यम असून त्यांना दिवसा गायिल्या जाणारे राग म्हणून मान्यता दिल्या गेली आहे.खरे तर नियमानुसार तीव्र मध्यम असलेले राग रात्रीच गायिल्या जायला हवे. एक असाही नियम आहे की,’ग’ ’नि’ कोमल असलेल्या रागात तीव्र मध्यम लागत नाही.मग कोमल ग नि सोबत तीव्र म असलेल्या सुरावटीचा राग मधुकंस कसा ? खरे तर राग गाण्याच्या नियमाला फार पुर्वीपासूनच फाटा दिला आहे हे ’दर्पण’ या ग्रंथातील "यथोत्काल एवैते गेया पूर्व्विधानतः / राजाज्ञया सदागेया नतु कालं विचारयेत् // आणि ’तरंगिणी मधील "दशदंडात्परं रात्रौ सर्वेषां गानमीरीतम् / रंगभुमौ नृपाज्ञायां कालदोषो न विद्यते // तसेच श्री बॅनर्जी यांच्या ’गीतसुत्रसार’ (Grammer of vocar music) ग्रंथामध्ये पान ५८ वर म्हणतात..."हमारे यहाँराग-रागिनियों को दिन तथा रात्री के नियमित समयों पर गाने की जो प्रथा चली आ रही है,वह केवल काल्प्निक है/" या वरूनही गानसमय प्रथेतील पोकळपण स्पष्टपणे दिसून येतो.खरे म्हणजे स्वर समुदायात अशी काही विशेषता नाही की,ज्यामुळे त्यांना काही खास वेळी न गायिल्याने योग्य तो परिणाम साधल्या जात नाही.संगीताचा उद्देश स्वरांद्वारे भाव व्यक्त करून श्रोत्यांचे मन प्रसन्न करणे एवढाच आहे.म्हणजेच या करीता कोणत्याही विशिष्ठ अशा खास वेळेची गरज नाही.जे भाव सकाळी व्यक्त होऊ शकतात किंवा करू शकतात ते सायंकाळी किंवा रात्री का करू शकत नाही ? नक्कीच करू शकते,शकायलाच पाहीजे.’पारिजात’ या ग्रंथात्भूपाली राग सकाळी गायिल्या जातो असा उल्लेख आहे.परंतू सध्या तो रात्रीकालिन मानल्या जातो.(घनःशाम सुंदरा...ही भूपाली रागातील भूपाळी सकाळी गोड वाटत नाही का ? सकाळच्या अहिर भै्रव रागातील ’पु्छो ना कैसे मैने रैन बिताई..’हे चित्रपटातील गाणे रात्री मन मोहतेच ना ?) दक्षिण भारतात यमन राग सकाळी व भैरवी रात्री गायिल्या जाते.तर काहींच्या मते ललित,रामकली,तोडी वगैरे राग सायंकाळी गायिल्याने गानसिद्धी उत्तम प्रकारे होते.म्हणजेच गानसमय हा प्रकार म्हणजे लोकांवर लादलेले थोतांड आहे हे सिद्ध होते.स्वर,स्वर आहे;राग,राग आहे,केव्हाही त्याचा परिणाम सारखाच अपेक्षित आहे. ते काहीही असले तरी यमन राग हा सर्वांचा आवडता आहे हे मात्र खरे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे कल्पक गायक,वादक,संगीतकारांवर हालवकर प्रसन्न होऊन वरही देऊन टाकतो.पण जर का यात भरकटला तर ’पचका’ होणे ठरलेले आहे.यमन गाता आला की सर्व राग गाता येतात असे जाणकार सांगतात.हा राग गायिला नाही असा गायक,वादक सापडणे अशक्यच ! इतका हा मधूर आहे.भारताच्या सर्व भाषा-बोलींमधील जेवढी गाणी या रागात बनली असतील तेवढी गाणी दुसर्‍या रागात तयार झालेली नसावी.सुगम संगीतकारांसाठी तर हा राग वरदानच ठरला आहे.कोणतेही भाव समर्थपणे व्यक्त करण्याची क्षमता यमन मध्ये आहे.हे एक संगीतकार म्हणून मी ठामपणे सांगू शकतो. (येथे मी तयार केलेल्या यमन रागाच्या विविध मूडच्या रचनांवर कोल्हापूरचे संगीत समीक्षक ऍडव्होकेट राम जोशी यांच्या लेखातील काही भाग देण्याचा मोह मला आवरत नाही.ते म्हणातात... "यमन हा रागच असा की कोणाही संगीतकारानं त्याच्या प्रेमात पडावं. कदम तरी त्याला कसे अपवाद असणार? त्यांनी यमन रागात उदंड रचना केल्या असल्या तरी त्या छापातले गणपती नाहीत, ती प्रत्येक मुर्ती स्वतंत्र आहे़. प्रत्येक चालीला स्वतःचा वेगळा चेहरा आहे, रंग आहे, रुप आहे, व्यक्तिमत्व आहे़. कार्यक्रमाची सुरुवात ते स्वरचित काव्याने करतात़. ‘सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी गातो गझल मराठी प्रिये तुझ्याच साठी’ दादर्‍यातल्या ह्या बंदिशीची यमन मधील ही रचना. अगदी साधी. सुगमसंगीतामध्ये अर्थातच शास्त्रीय संगीतातील व्याकरणाला; नियमांना स्थान नाही, इथं अपेक्षित असतं ते श्रवण सौंदर्य, गोडवा, मोहकता. साहजिकच इथं शुध्द यमन शोधण्याची धडपड करू नये कारण तो यमन कल्याणाशी क्षणांत दोस्ती करतो़ आणि दोन्ही माध्यमांच्या अशा हळुवार लगावांची प्रचिती आली की उत्स्फूर्तपणे दाद देण्याशिवाय श्रोत्याला इलाजच रहात नाही़ ही अनुभूती मी त्यांच्या प्रत्येक यमनांत घेतली व घेतो़. ‘मी असा ह्या बासरीचा सूर होतो, नेहमी ओठांपुनी मी दूर होतो’ ह्या गझलची चालही अशीच आहे़. धृवपदातली -मतल्यातली दुसरी ओळ (ज्याला क्रॉस लाईन म्हणतात) त्याची ठेवण व स्वरसमुहाची रचना अत्यंत मोहक आहे़. त्यातील ‘सूर होतो़’ इथं तार सप्तकातला षडज्‌ सूर ह्या शब्दासाठी खुबीनं वापरला तर आहेच पण ती ओळ म्हणताना ‘सूर’ हा शब्द आणि त्याचा तारषड्जाचा हळूवार पण भरीव लगाव व रुपक तालांचा एक पूर्ण जादा आवर्तन पूर्ण होईपर्यंत जो दीर्घकाळ मुक्काम ठेवतो तो अतीसुंदर लागतो़. संगीत रचनाकाराकडं नुसता सांगीतिक अलंकाराचा साठा असून चालत नाही तर स्वरपोषाखाला साजेल असाच एखादाच चढविलेला अलंकार संगीत श्रवणसौंदर्य खुलवितो़. संगीतकार हाच खर्‍या अर्थानं स्वतःच्या रचना समर्थ पणे व अपेक्षित परिणामासह गाऊ शकतो. हा अनुभव मास्तर कृष्णरावांपासून सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, राम कदम, यशवंत देव यांच्या पर्यंत येतो. सुधाकर कदम हे स्वतः गायकही असल्याने तेही ह्या बाबीला अपवाद नाहीत़. ‘सूऱ होतो’ इथं शब्दकला आणि स्वर माधुर्य असा सुरेख समन्वय झालाय़. ‘सांज घनाच्या मिटल्या ओळी’ हे एक अतिशय हळूवार भावना उलगडून दाखविणारं सरस काव्य़. कदम यांनी बंदीशही यमनमध्येच बांधलीय़. त्यातल्या क्रॉसलाईन अखेरीस़ ‘क्षितीजावरती़’ इथं त्यांनी नि व कोमल रिषभाचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर करून यमनचा करॅक्टरच बदललाय असे नव्हे तर त्या रिषभाच्या योजनेमुळे ‘क्षितीज’ ह्या शब्दाचा अर्थ प्रतीत करण्यासाठी कोमल रिषभाला पर्यायच नाही हे त्वरीत पटते, पुरियाचं होणारं दर्शन तसेच कडव्याची चाल हे सगळं सुरेख जुळून आलंय़. प्रसिध्द कवी अनिल कांबळे यांच्या ‘जवळ येता तुक्या दूर सरतेस तू / ऐनवेळी अशी काय करतेस’ तू ह्या गीताची तर्जही यमन मध्येच बांधली आहे़. यमन मधली अत्यंत चटपटीत अशी ही स्वररचना, खेमट्याच्या अंगानं लागणारा दादर्‍याचा ठेका, लय थोडीशी उडती चपळ, त्यामुळे विशिष्ट अर्थवाही अशा ह्या गीताला उत्तम न्याय मिळाला आहे़. सौंदर्य स्थळाचा निर्देश करायचा झाल्यास ‘ऐनवेळी अशी काय’ ह्या ओळीतली अधीरता दर्शविण्यासाठी अत्यंत चपखल अशी स्वरसमुहरचना म्हणावयास हरकत नाही. ‘सामग, सामगधप’ वगैरे अर्थात हा आनंद अनुभवायचा आहे़. ‘तुझ्या नभाला गडे किनारे’ ही सुध्दा यमनमधलीच श्रवणीय रचना आहे. यमन ह्या एकाच रागातल्या चारी रचना त्यांनी मला एकापाठोपाठ ऐकविल्या. पण खासियत अशी की त्यांत तोचतोचपणा नाही़. स्वररचनेची पठडी ठरीव स्वरुपाची नाही. त्यात आहे पूर्णतः वेगळेपण, हे श्रेष्ठ संगीत रचनाकाराचं वैशिष्ट मानलं जातं. सुगम संगीतात आकर्षक मुखड्याला-धृवपदाला खास महत्व आहे़.कदम यांच्या स्वररचनेचे मुखडे अत्यंत आकर्षक असतात़. त्याहीपेक्षा अधिक कौशल्य व महत्व असतं ते मुखड्यानंतरच्या क्रॉसला. कारण संगीत रचनेच्या आकर्षकतेचे ते प्रमुख स्थान आहे़. मुखड्याच्या चालीला अनुरूप अशी किंबहुना त्याचं सौंदर्य वर्धिष्णू करणारी आरोही पूर्ण करुन अवरोही व षड्जावर विराम पावणारी स्वररचना, हे काम फार अवघड असते़. तसे नसेल तर पूर्ण चालच फसते़ अनेक संगीत रचनामध्ये हे दोष दिसतात़. संगीतकाराला इथं आपली प्रज्ञा ओतावी लागते़. सुधाकर कदमांच्या रचना ह्या कसोटीला पुरेपूर उतरणार्‍या आहेत म्हणूनच त्या भावतात़. कडव्यांच्या चालीतही मूळ चालीशी सुसंगती दिसते़. कळत नकळत अन्य रागाला स्पर्शून जाणं म्हणजे हळूच मधाचं बोट चाखण्यासारखं गोड मधुर असतं.अर्थातच शेवटच कडवं हे सर्वार्थानं हायलाईट असतं. तशीच त्याची स्वररचनाही कदम समर्थपणे करतात़. एकाच यमनाची ही विविध रुपे, विविध रंग, त्याचा वेगवेगळा ढंग. आणि त्याची अनोखी अदाकारी हे मोहजाल किंवा मायाजाल म्हणा, असं आमच्या भोवती टाकलं की आम्ही स्वतः जाणकार रसिक असूनही फसलो़. मग लक्षात आलं की ही यमनी फसवणूक होती पण ही फसवणूक गोड होती़. निर्भेळ होती.") यमन हा अभंगापासून तॊ लावणीपर्यंत सर्व प्रकारात रंगतो म्हणा किंवा रंगवितो म्हणा !मराठीमध्ये जवळ-जवळ सर्वच संगीतकारांनी यात स्वररचना केली आहे.त्याची यादी करतो म्हटले तर तो एक मोठा लेखच होईल.तरी पण काहींचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही.’धुंदी कळ्यांना...’, ’का रे दुरावा...’, ’पराधीन आहे जगती...’, ’तोच चंद्रमा...’, ’पिकल्या पानाचा देठ की ग हिरवा...’, ’कबीराचे शेले विणतो...’, ’सुखकर्ता दुखहर्ता...(आरती)’, ’जिथे सागरा धरणी मिळते...’, ’जीवनात ही घडी...’, ’शुक्र तारा...’, ’तिन्ही सांजा सखे मिळाल्या...’, सोबतच अनेक नाट्यगीतेही यात आहेत.त्यातील अभिषेकी बुवांनी मत्स्यगंधा नाटकाकरीता रचलेले स्वरशिल्प ’देवाघरचे ज्ञात कुणाला...’ हे मला अतिशय भावले.गायक आहेत रामदास कामत. हिंदी चित्रपटसृष्टीतही यमन ने धुमाकूळ घातला आहे.सैगलच्या ’मैं क्या जानू क्या जानू रे...’ पासून तर आता-आताच्या ’तुम दिल की धडकन हो....’पर्यंत...यातील उल्लेखनीय गाणी आहेत...’मन रे तू काहे न धीर धरे...’, ’जिया ले गयो...’, ’जा रे बदरा बैरी जा...’, ’वो हँसके मिले हमको...’, ’पान खाये सैयाँ...’, ’इस मोडपर आते है...’, ’चंदन सा बदन...’, ’आँसू भरी है ...’, ’जब दीप जले आना...’ अशी किती गाणी घ्यावीत...............? उर्दू ग़ज़ल मध्ये ’रंजिश ही सही....’ही ग़ज़ल म्हणजे मैलाचा दगड आहे.सोबतच ’वो मुझसे हुये...’, ’शाम-ए-फ़िराक...’ ह्या गझला आणि ’आज जाने की ज़िद ना करो...’ ही फ़रीदा खानम यांनी गायिलेली रचना म्हणजेही कळसच आहे.यात ’मरीज़े मुहब्बत...’, ’दिलवालों क्या देख रहे हो ह्या ग़ुलामलीच्या गझला आपला वेगळा रंग दाखवितात.’क्युँ मुझे मौत के पैग़ाम दिए जाते है...’ (शोभा गुर्टू), ’तुम आए हो तो शबे इंतज़ार गुजरी है...’ (इकबाल बानो), ’आपका इंतज़ार कौन करे...’(शुमोना राय) या गझलाही अतिशय श्रवणीय आहेत. उर्दू गझल गायनातील मेहदी हसन साहेबांनी गायिलेली अहमद फ़राज़ यांची ’रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ...’ या गझलने लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढले.(खरे म्हणजे हे ’मोहब्बत’ या १९७२ सालच्या पाकिस्तानी सिनेमातील गाणे (ग़ज़ल) असून,याचे संगीतकार निसार बज़्मी हे आहेत.पण खाँ साहेबांनी महफिलीत गाऊन या रचनेचे सोने केले.)या गझल सोबतच यमन रागाचीही लोकप्रियता (गझल गायनाचे संदर्भात) परमावधीला पोहचली.मूलतःच गोड असलेल्या या रागात फ़राज़ साहेबांचे शब्द, खाँ साहेबांचा जव्हारदार मधाळ आवाज आणि शब्दांना साजेशी विनवणी करणारी बंदिश असा उच्चतम कोटीचा संगम यात झालेला दिसून येतो.याची ’सम’ तशी ऐकायला सोपी पण गाठायला कठीण अशी आहे.’आ फिरसे मुझे छोडके जाने के लिए आ’ या ओळीनंतर पुन्हा ’रंजिश’ हा शब्द येतो तेव्हा वेगळ्या प्रकारे समेवर येतो.त्यामुळे गझलची लज्जत आणखी वाढते. यातील प्रत्येक शेर गायकी अंगाने सादर केल्यामुळेगझल गायकीची वेगळी मजा चाखायला मिळते.’जैसे तुम्हे आते है न आने के बहाने’ या सेरातील ’जैसे’ या शब्दावर खर्जात केलेली ’ऩि प़ सा---सा सा सा ऩि रे - रे- रे रे ऩि रे प ग रे’ ही कारागिरी आणि नंतर यमन मध्ये नसलेला कोमल गांधार घेऊन केलेले स्वरांचे नक्षीकाम भल्या-भल्यांना मोहवून टाकते.त्या नंतरचे ’न आने के बहाने’ या वरील गांधार ते निषाद ही सुरावट सुद्धा ’बहाने’ दाखवते.त्यामुळे या गझलमध्ये जे एक आर्जव आहे ते यमन मुळे पुर्णत्वाने दाखविल्या गेले आहे.’इक उम्र से हूँ...’ या मिसर्‍यातील तार षड्जावरून खाली येऊन ’महरूम’ या शब्दाच्या शेवटी वापरलेला तीव्र मध्यमही असाच ’वंचितत्व’ स्पष्टपणे दाखवितो.आणि लगेच पुढच्या ओळीतील षड्जाला धरून केलेली विनवणी लाजवाबच...दुसरा शब्द नाही.असा हा यमन... याच यमन मध्ये सुप्रसिद्ध गझल गायिका व संगीतकार मधुरानी (मागील लेखातील लडिवाळपणे गाणारी गायिका म्हणून जिचा उल्लेख मी केला होता ती.)यांनी स्वरबद्ध केलेली ’कहाँ थे रात को’ ही दाग़ यांची गझल त्यांचीच शिष्या पिनाज़ मसानी हिने त्यांच्याच ढंगात अतिशय सुंदर रित्या सादर केली आहे.ऐकू या...


 

सदानंद डबीरांच्या गजलेचा मागोवा ‘काळिजगुंफा’च्या अनुषंगाने _डॉ राम पंडित

                                               


स्व. सुरेश भटांनी 1963 पासुन गजला लिहिण्यास सुरुवात केली. गजलला मराठी भाषा व संस्कृतीचा चेहरा दिला. दुर्बोधतेकडे झुकलेल्या तत्कालीन मराठी कवितेला कंटाळलेल्या रसिकमान्य वर्गाला प्रसादगुणयुक्त, मोहक तरलता ल्यालेली भटांची गजल भावली. या गजलेचे श्रोते व वाचकांशी भाव-साहचर्य वाढत गेले. अल्पकालावधीत गजलेस जनस्वीकृती मिळाली अन्‌ अनेक तरुण कवी व काही अकवी गजल-सृजनाकडे आकृष्ट झाले. मुलत: कवी असलेले मोजकेच जण तंत्र अवगत करून गजल रचना करू लागले. यास भट संप्रदाय असे संबोधण्यात येऊ लागले. मराठीत गजल-सृजनास चळवळीचे स्वरूप आले. बव्हंश कवींवर भटशैलीचा प्रभाव अनुकरण सीमेपर्यंत होता. त्यांचाही नाइलाज होता कारण त्या सार्‍यांसमोर रोल मॉडेल भटच होते. हळूहळू या बाजारगर्दीतून हातांच्या बोटांवर मोजता येईल इतकेच जण बाहेर पडले व त्यांनी आपल्या गजलची स्वतंत्र ओळख स्थापित केली. यातील एक अग्रगण्य नाव सदानंद डबीर होय.
‘लेहरा’, ‘तिने दिलेले फूल’, ‘खयाल’, ‘आनदं भैरवी‘ अन्‌ ‘काळिजगुंफा’ या पाच काव्यसंग्रहातील पहिल्या दोन संग्रहांत कवितागीतांचे प्रमाण अधिक आहे. लेहरा संग्रहातील गजलांवर भटांच्या शैलीची झाक अवश्य आहे. पण पुढे डबीरांच्या गजलानी वेगळे वळण घेतले अन्‌ आपली स्वतंत्र शैली निर्माण करणार्‍या निवडक गजलकारांत त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. ‘खयाल’ व ‘काळिजगुंफा’ हे प्राधान्याने गजलसंग्रहच आहेत.
डबीरांची गजल भटांच्या प्रभावातून पूर्णपणे बाहेर पडली आहेच, पण समकालीन कवींपेक्षा त्यांची अभिव्यक्ती पृथक आहे, हे खालील शेर बघता सहजच जाणवेल.

काळिजगुंफेमधला वारा जरा हालला बहुधा
मनात माझ्या तुझा चेहरा जरा तरळला बहुधा
---
भ्रमनिरास होतो तेव्हा, ते ज्याचे त्याला कळले
आवाज न करता काही, हृदयातील घर कोसळले

खरे तर गजल ही विधा पद्य वाङमयाचा एक प्रकार आहे. तिला सूत्रबद्घ कवितांची छंदोबद्घ माळ म्हणणे उचित ठरेल. गजलेत कवितेची आशयघनता व गीतांची कर्णमधूरता अंगभूत असणे अपेक्षित आहे. शेरातील काव्य ज्या विशिष्ट पद्घतीने गजल व्यक्त करते ती अभिव्यक्ती-शैलीच गजलेला कविता व गीतांपासून पृथक करते. फरक फक्त अभिव्यक्तीचा, सादरीकरणाचा आहे. अन्यथा गजल हे शृंखला-पद्यच आहे.
डबीरांच्या गजलेत ‘खयाल’ या संग्रहापासून अलगदपणे शैलीत परिवर्तन घडत गेले. त्यांची गजल उत्तरोत्तर गंभीर, चिंतनात्मक व जीवनविषयक प्रश्नांचा मागोवा घेणारी होत गेली आहे. आता ती काही वर्गाला कवितेच्या जवळ जाणारी वाटेलही, कारण कवितेच्या व गजलेच्या सीमारेषा आधुनिक गजलेतही पुसट होत आहेत. उर्दूतील म. अलवी, बानी, कुमार पाशी, आदिल मंसूरी यांपासून म्हणजे जवळपास 1980 पासूनच ही प्रक्रिया प्रारंभ झाली होती. नवीन उर्दू शायरांनी ती पूर्ण करीत आणली आहे. तर मराठीत डबीरांनी ह्या शैलीचा प्रारंभ केला आहे असे म्हणता येईल.


असे बरेचसे शेर जीवनाच्या वास्तवाचे तरल, संक्षिप्त वर्णन करतात तेव्हा ती डबीरीय गजल-शैली आहे हे लक्षात येते.
गजलेत शब्द व गजलकारास अभिप्रेत असलेला आशय यांचा भावबंध अत्यंत महत्वाचा असतो कारण छंदनिर्वाहासाठी अनेकदा शब्दांबाबत तडजोड करावी लागले अन्‌ शब्द आशयाशी प्रतारणा करतात. म्हणून डबीरांनी गजलच्या शेरांची संख्या अकारण वाढविण्याचे कटाक्षाने टाळले. काही गजला तर चारच शेरांच्या ठेवल्या. एवढेच नव्हे तर सभोवती गजल सृजनाचे उदंड पीक येत असतानाही त्यांना गजलच्या बहुप्रसवतेची लागण झाली नाही, ही स्पृहणीय बाब होय.

भणंग माझे जिणे असे दे, व्यथा असू दे
या फकिराच्या ओठांवर पण, दुआ असू दे

या पसायदानस्वरूप गजलेत स्वरकाफिया (था व आ) वापर आहे. या गजलेत त्यामुळे अनेक शेर गुंफणे सहज शक्य होते. पण केवळ सहा शेरांतच ही गजल परिपूर्ण झाली आहे. म्हणजे यमकानुगामी गजल रचण्याकडे डबीरांचा कल नाही, हेच दिसून येते.
सूत्र ग्रंथ व भाष्य ग्रंथ यांच्यात ते साधर्म्य-वैधर्म्य आहे तेच कविता व गजल यांमध्ये आहे. गजल सूक्तिसंग्रहासारख तर त्यातील एकेक सूक्तीची कैफियत कवितेत असते. गजलेत कवितेप्रमाणे महाकाव्य संभवत नाही. गजलेच्या बाह्य व आंतर संरचनेत मर्यादा आहेत. एखादा मोठा विचार कवितेत सहजपणे शब्दबद्घ करता येतो. मात्र गजलेत तो सूत्ररूपानेच मांडता येतो. ही तिची अंगभूत अपरिहार्यता आहे. पण ही सूत्ररूपशैली जेव्हा कलात्मकरित्या पेश होते तेव्हा सौंदर्यानुभव देते व वाचक श्रोत्यांच्या मन-बुद्घीत अंकित होते. असेच काही शेर डबीरांनी लिहिले आहेत ते नमुद करण्याचा मोह आवरत नाही -

सांजयात्रेला निघाल्या लांबणार्‍या सावल्या
थांबलेल्या माणसांच्या हालणार्‍या सावल्या
---
अंधुक अंधुक किती चेहरे स्मरणातून ओघळली
धुक्यात गुरफटलेली झाडे, तशी माणसे दिसती
---
झाकलेले दु:ख माझे आज बाजारात आले
बघ तुझ्या दुनियेत माझे नाव रातोरात झाले

मध्यंतरी मराठी गजलेत काही कवींच्या शेरांत तुच्छतावाद, अहंभाव, आत्मप्रौढीचभाव नको तितक्या प्रमाणात दाखल झाला होता. विशेष म्हणजे सुखासीन जीवन जगणार्‍या कवींच्या गजलांत हा भाव आल्याने गजल कृतक भासू लागली हे सहजस्फूर्त काव्य नव्हे याची जाण वाचक/श्रोते यांना असू शकते, हे या कवींना कळत नसावे. अशात डबीर व त्यांचे काही समकालीन, सकारात्मक प्रत्यय देणारे शेर लिहू लागले, तेव्हा गजलेत शैली परिवर्तनाची चाहूल लागली.

सूर नाही, साज नाही गीत हे आहे कसे?
हे कसे एकांत माझे गुणगुणाया लागले !
---
येणारा प्रत्येकच क्षण नवीन
जगणे हे रोजचेच-पण नवीन!
---
मी तुझ्यासाठीच होते एक गाणे गायिले
अजुन फांदीवर स्वरांचे पाखरू ते थांबले !

ही तरल शैली संवेदनशील कविता अन्‌ गीतांचा समन्वय साधणारी आहे.
डबीरांना मुशायर्‍याची दादलेचा गजल व वैचारिक अधिष्ठान असलेली चिंतनशील गजल अशा दोन्ही शैलीत गजल रचण्याची किमया साधलेली आहे. विरोधाभास व चमत्कृती, नाट्यमयता हे मुशायर्‍याच्या गजलेचे वैशिष्ट्य गणले जाते. (वाङमयीन जाण असलेले श्रोते असले तर चिंतनशील शेरदेखील दाद घेतात.) दादलेवा शेर बहुधा हजल अंगाने जातात व साधारणत: तत्कालीन घटनेवर भाष्य करतात, डबीरांचे हे दोन शेर बघा-

कोण जाणे कोणता हा देश आहे
कावळ्यांना पांढरा गणवेश आहे!
---
कोळशाची खाण आहे हात काळे व्हायचे
काय मंत्र्यांनी लगेचच, राजीनामे द्यायचे?

                                                         


वृत्ती/प्रवृत्तीवर उपहासगर्भ टिप्पणी हे दादलेवा शेरांचे एक वैशिष्ट्य आहे ते असे.
संस्कृत, मराठीचे मोजके छंद सोडले तर बहुतांश छंद गेय असले तरी कष्टसाध्य आहेत. त्यांत छंदोबद्घ रचना करताना कवींना निश्चितच शब्दांबाबत तडजोड करावी लागे, आशयाला काही अंशी मुरड घालावी लागत असावी. याउलट अनेक अरबी फारसी छंदांत अनन्यसाधारण लयबद्घता असून त्यांत काव्य-सृजन त्यामानाने अधिक सहजपणे करणे शक्य आहे. अर्थात मुक्त वा गद्य काव्य-सुजनापेक्षा, आघातनिष्ठ छंदोबद्घ काव् य-सृजन (तंत्रानुगामी असल्याने) कृतक भासणे स्वाभाविक आहे. इथेच कवी गजलकाराच्या नैपुण्याचा कस लागतो. आपल्याला अभिप्रेत असलेल्या आशयाचे काव्य-सृजन, शब्द आशयाबाबत तडजोड करूनही, तसे भासू न देणे हीच खरी कला आहे. वार्णिक वृत्तांपेक्षा मात्रिक छंदांचा वापर करून हा हेतु साध्य करता येतो. मात्रिक छंदांनी छंदोबद्घ काव्याचे क्षेत्र अत्यंत विस्तारते. तसेच स्वरानुगामी यमकांचा वापर करून गजलेवरील कृत्रिमतेचा आरोप खोडून काढता येतो याचा प्रत्यय डबीरांच्या खालील शेरावरून येईल -

तुला वाटते जगणे म्हणजे गाणे असते
खरे सांगतो जगणे हे तर ओझे असते

इथे काफिये ‘गाणे’, ‘दाणे’, ‘आणे’ न येता ‘गाणे’, , ‘ओझे’, ‘ताजे’, ‘साधे’, ‘कोडे’, ‘जगणे’, इ. आले आहेत. यात ‘ए’, हा स्वर व्यंजनांसह सांभाळला आहे. हा स्वरानुगामी काफिया होय. हा काफियाने अभिव्यक्तीच्या कक्षा वाढतात व एकसुरीपणा कमी होतो.
उच्च श्रेणीची गजल वाचक किंवा श्रोत्यांच्या मन व बुद्घीचा त्वरित ठाव घेते. तिच्या अंतरंगता दर्जेदार कवितेची आशयघनता अन्‌ सुरेल गीताची लय अंगभूत असते. गालिबचे अनेक शेर या निकषांवर पडताळून पाहता, माझे हे विधान अवश्य पटेल. असे सार्वकालीन शेर मोजक्याच मराठी गजलकारांच्या गजलांत आढळतात. त्यात डबीरांच्या शेरांची संख्या लक्षणीय ठरते.

जमेल तितके जगायचे हे ठरले आहे
निरोप येता निघायचे हे ठरले आहे

निर्भीडपणे मरणाला समोर जाण्याचीही तयारी स्थितप्रज्ञ वृत्तीतूनच साकार होऊ शकते कारण तीच व्यक्ती मृत्यू नामक अटळ गोष्टीबाबत अशी त्रयस्थ व शांत स्वीकृती नोंदवू शकते. नियतीचे कार्य कोणी बदलू शकत नाही हे जाणतो, पण एक प्रकारच्या बेदरकार वृत्तीने तोच हे सत्य मांडू शकतो.

आरशातली भ्रामक प्रतिमा खरी समजलो
निर्दय, कपटी दुनियेलाही भली समजलो

पहिल्या मिसर्‍यात अज्ञान दशेतील जगन्मिथ्या वाद मांडला गेला आहे.

चेहरे वाचले, माणसे चाळली
आणि तेव्हा कुठे जिंदगी समजली

हा एक शाश्वत शेर आहे. जीवनाचे आकलन होण्यासाठी जीवनात भेटणारी माणसे समजणे गरजेचे आहे. बाह्य रूपावरून नव्हे तर चेहर्‍यांवरून, त्यातील भाव व भावातून त्यांचे अंतरंग म्हणजे वृत्ती-प्रवृत्ती कळणे गरजेचे आहे. अशा प्रक्रियेनेच जीवन साकल्याने उलगडू शकते.
डबीरांनी अनेक वेधक व अनवट रदीफ (अंत्ययमक) आपल्या गजलांत वापरले आहेत. उदा. घ्गंमत आहेङ, घ्अभिनय केलाङ इत्यादी. अनेक गजलकारांनी तो त्वरित वापरण्याची घाई केली त्यामुळे त्या रदीफमध्ये रचल्या गेलेल्या इतरांच्या गजला म्हणाव्या तेवढ्या चांगल्या उतरल्या नाहीत.
रदीफ व काफिया हे गजलेचे सौंदर्यतत्व आहे. छंदांमुळे उत्पन्न होणार्‍या लयीला पुरक आल्हाददायक गेयवृद्घी रदीफ व काफियांमुळे होते व शेरात नादमाधुर्य अवतरते. यामुळेच शेरातील आशयाची अनुभूती रसिकांना येते. याचा प्रत्यय डबीरांच्या खालील शेरावरूनच सहज येईल -

फुलांनी दृष्ट काढावी असा तो चेहरा आहे
कळ्यांची नजर लागावी असा तो चेहरा आहे

गव्हाळी गौर रंगाला नव्हाळी सोनचाफ्याची
सणाला गौर मांडावी असा तो चेहरा आहे

अनेक कवींची काव्य अभिव्यक्ती फक्त गजलेतच होते हे मला पटत नाही. ही मंडळी काव्यप्रांतात कवी म्हणून स्वत:ला सिद्घ करू शकली नाहीत. पण कार्यशाळेतून बाहेर पडल्यावर त्वरित गजलकार बनली. अल्पावधीत गजलसंग्रह काढून त्यात भटांच्या अभिनिवेषात गजलरचनेचे तंत्र व मंत्रही शिकवू लागली. ज्यांना स्वत:ला मार्गदर्शनाची गरज आहे तेच मार्गदर्शक बनू लागले ह्यासारखा दुसरा विनोद नाही. यामुळेच कदाचित गजल सृजनाचे क्षेत्र खुद्द गजलकारांच्या ऐवजी सुमार दर्जाच्या गायकांच्या हाती गेले. कवितेच्या क्षेत्रात अजूनही ‘कवी’चा दबदबा आहे. ते गायनानुकुल लिहीत असतील; पण अद्याप गजलकारांसारखे गायनानुकूल लिहीत निश्चित नाहीत.
डबीरांनी गजलची विविध रूपे आपल्या समग्र काव्यसंग्रहातून दाखविली आहेत. घ्दंवात न्हाल्या फुलांसारखी दिसायची तीङ, ‘फुलांनी दृष्ट काढावी’ असा तो चेहरा आहे’, अशा श्रृंगारिक गजला तर ‘कोळशाची खाण’, ‘तहलका’, ‘कोण जाणे कोणता हा देश आहे’, अशा राजकीय गजला, ‘एरव्ही जगासवे मी खरेच बोलतो’ आदि मदिरारंगाच्या गजला, ‘काळिजगुंफेमधला वारा’, ‘अंधुक अंधुक कितीक चेहरे’, ‘सांजयात्रेला निघाल्या लांबणार्‍या सावल्या’, अशा ग्रेस शैलीच्या प्रतिकात्मक गजला, याशिवाय अज्ञाताचा शोध घेणार्‍या गजला, ‘माझ्याच सारखा कोणी’, ‘ती नदी न दिसते कोणा’, ‘मी कोण कोठला’ अन्‌ प्रार्थना स्वरूपाच्या ‘भणंग माझे जिणे’, अशा विविध स्वरूपाच्या गजला त्यांच्या संग्रहात आहेत. कदाचित याचं स्पष्टीकरण हे असावं -

धूर येतो कोठुनी हे कळत नाही
कोणती ही आग आहे ? दिसत नाही

ही आग आंतरिक काव्यप्रतिभेची असते, ती सृजनाद्बारे अभिव्यक्त होण्यास अधीर असते, डबीर म्हणतात-

कधी हसते कधी रुसते कधी ती फार छळते रे
कधी कविता, कधी गाणे कधी ती गजल असते रे

कोणतीही कवीची काव्य अभिव्यक्ती केवळ एकाच आकृतिबंधात व्हावी हे मला तरी तितकेसे पटत नाही. डबीर म्हणतात त्याप्रमाणे कविता, गीत, गजल असा विविध पद्यरूपात ती साकारत असते हेच खरे. एका फॉर्ममध्ये आयुष्यभर रचना करणार्‍यांच्या (विशेषत: छंदोबद्घ रचनेबाबत) रचनांवर कृत्रिमतेचा आरोप होण्याचीच शक्यता अधिक असते.
आकृतिबंधाचा विचार करता कवितेपेक्षा गजलची प्रमाणबद्घता अधिक असल्याने तिच्यात सहेतुक पाल्हाळ लावता येत नाही, हीच तिची मर्यादा अन्‌ ताकदही आहे. मोजूनमापून, अचूक शब्दयोजना करणे गरजेचे असते. याने गजल लालित्यपूर्ण होण्यास मदत होते. या संदर्भात डबीरांचे दोन शेर बघा -

काहीही कारण नसता, मी उगाच हसतो आहे
दुनियेत शहाण्यांच्या मी, वेडेपण जपतो आहे
---
तू मनाचा कोष विणूनी भोवती अंधार केला
मृगजळास्तव धावण्याचा का असा अविचार केला?

मराठी काव्यसमीक्षकांनी मराठी गजलची हवी तेवढी दखल घेतली नाही याची खंत करीत गजलकार, त्यांना गजल कळत नाही असा तर्क देतात. पण हे बरोबर नाही. भटांच्या प्रतिभेपर्यंत पोहोचणारी गजल अद्याप तरी मराठी गजलकार देऊ शकले नाहीत. विषयवैचित्र्याच्या दृष्टीने मराठी गजलने बरीच प्रगती केली. पण उर्दूच्या तुलनेत तिच्यात अजूनही एक प्रकारचा शुष्कपणा जाणवतो अन्‌ काफियांच्या मर्यादांमुळे एकसुरीपणा आढळतो. कार्यशालेयनिर्मित गजलकार काफियाच्या अंगाने म्हणजे यमके काढून गजलरचना करतात. छंदोबद्घ रचनेत एका मर्यादेनंतर ‘क्राफ्टमनशिप’करावीच लागते हे मान्य करूनही काफिया काढून गजलरचना करणे ही बाब त्याही पलीकडची वाटते. कदाचित विषयवैचित्र्यांच्या शेरांमुळे समीक्षकांना रसानुभवात व्यत्यय जाणवत असावा. काव्याचा आस्वाद घेताना विषयांचे मार्गांतरण त्यांना ग्राह्य होत नसावे.
भटांच्या अनेक गाजलेल्या गजला क्रमबद्घ (म्हणजे मुसलसल-एकाच भाववृत्ती व विषयावरील) गजला आहेत. डबीरांच्याही बहुतांश गजला क्रमबद्घ आहेत. ‘फुलांनी दृष्ट काढावी’, ‘एक म्हातारा हरवला’, ‘सांजवेळी’, ‘गाव सोडुनी निघताना’, ‘माझ्यासारखा कोणी’, या शीर्षकांच्या गजला या संदर्भात नमूद करता येतील. उर्दूत क्रमबद्घ गजलांना गजलनुमा नज्म म्हणजे गजलसदृश कविताही म्हणण्याचा प्रघात आहे. पण या गजलांतील शेर एकसंध प्रभाव देत असूनही प्रत्येक शेरात एक परिपूर्ण कविता विद्यमान असल्यास ती गजलच म्हणणे संयुक्तिक ठरते. चांगल्या गजलेतील शेरात विलगता असून एक अदृश्य अशी आंतरिक सलगता असते. याचा प्रत्यय डबीरांच्या उपरोक्त नमूद गजला वाचल्यावर येतो.
गजल कार्यशाळांमुळे मराठीत काफियानुगामी, सांकेतिक आणि कृतक गजलांचे एक आवर्त आले आहे. डबीरांची गजल त्या आर्वताला छेद देऊन तरल, काव्यमय, मुसलसल बाज घेऊन आली आहे. गजल रसिकांप्रमाणे, ती, कवितेच्या जाणकार, संवेदनशील वाचकालाही आकृष्ट करेल असे वाटते.
‘काळिजगुंफा’ हा संग्रह ‘ग्रंथाली’ ने अत्यंत आकर्षक पद्घतीने पेश केला आहे. त्यासाठी ग्रंथालीचे अभिनंदन. ‘काळिजगुंफा’, या संग्रहाद्बारे डबीर गजलांची एक वेगळी तरल शैली रुजवू पाहत आहेत; ती भौतिकतेतून दार्शनिकतेकडे झेपावत आहे. कविता आणि गजलमधली सीमारेषा आधुनिक उर्दू गजलमध्येही पुसट होत असताना, डबीरही म्हणताहेत -

‘गगनधरेची सीमारेषा पुसून गेली
कवेत आले गगनच अवघे विशाल आता’

(‘काळिजगुंफा’, सदानंद डबीर, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई पृष्ठे 72, किंमत 75 रूपये)
________________________________________________________
डॉ. राम पंडित, 4, अटलांटा सोसायटी, फ्लॅट नं. 29, सेक्टर 40, सी-वूडस्‌ दाराव्हे (प.), नवी मुंबई - 400706 दूरध्वनी : 022-27723756]

२७ वर्षांचा सुरेल गझल प्रवास_ माधव डोळे
            एखाद्या तरल गझलचे सूर कानावर पडले की नकळत मन हरवून जाते. गझलचे शब्द व चाल याचा अनोखा संगम गझलमध्ये होतो तेव्हा तर आकाश ठेंगणे होते. गेली अनेक वर्षे विदर्भाच्या अकोल्यातील एक मराठी गायक गझल गायनाच्या क्षेत्रात निष्ठेने काम करतोय. त्याचे नाव आहे दिनेश अर्जुना. हिंदी—उर्दू गझल गायनाच्या अनेक मैफली त्यांनी केल्या आहेत. त्यांचे मूळ नाव आहे दिनेश अर्जुन निंबाळकर.’                                   
          
              `तसा न चंद्र राहीला’ हा त्यांचा मराठी गझलांचा पहिलाच अल्बम नुकताच प्रसिद्ध झाला. मराठीतील ज्येष्ठ गझलकार प्रा. श्रीकृष्ण राऊत यांच्या सात गझला यात आहेत. गेली पंचवीसहून अधिक वर्षे गझल गाणार्‍या अर्जुना यांचा पहिला अल्बम असला तरी त्यातील सर्व चाली रसिकांच्या मनाला भिडणार्‍या आहेत.
सध्या रेकॉर्डिंगचे तंत्र अत्याधुनिक झाले आहे. रोज अनेक अल्बम्स मार्केटमध्ये येतात पण त्यातील गाण्यांचे आयुष्य किती असते हे सर्वांनाच ठाऊक आहे.दिनेश अर्जुना यांच्या अल्बममधील गझला या त्यास अपवाद ठरतील.

या अल्बममधील एका गझलेला दिनेश अर्जुना यांनी तब्बल २७ वर्षांपूर्वी चाल लावली. या गझलचा मतला आहे...


तसा न चंद्र राहिला तशी न रात राहिली

अजूनही तशीच तू तनामनात राहिली 


              या गझलचा किस्सा गमतीदार आहे. अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयात प्रा.श्रीकृष्ण राऊत शिकवित होते. दिनेश अर्जुना हे त्याच कॉलेजचे विद्यार्था. लहानपणापासून गायनाची आवड. शाळेत असतानाच पाठयपुस्तकांतील कवितांना चाली लावून त्या गाण्याचा छंद जडला होता. वडील उत्कृष्ट हार्मोनियम वाजवायचे. त्यामुळे संगीताचे संस्कार घरातूनच मिळाले. कॉलेजमध्ये ते ’गायक दिनेश’ म्हणून लोकप्रिय होते. अकोल्यात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा होती. या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. राऊत सरांच्या घरी जाऊन त्यांनी मराठी गझल मागितली. ती गझल घेऊन ते घरी आले. त्याचे शब्दच एवढे दिलखेचक होते की अतिशय सुरेख चाल लावली. एवढेच नव्हे तर दुसर्‍याच दिवशी सरांच्या घरी जाऊन त्यांना ही चाल ऐकवली. ती ऐकताच राऊत सरांना धक्काच बसला. कारण रदीफ, मतला, अलामत, जमीन या गझलच्या व्याकरणाबाबत फारशी माहिती नसतानाही त्यांनी लावलेली चाल ही शब्दांच्या पलिकडची होती. सरांच्या तोंडून फक्त उद्गार आले.. व्वा क्या बात है... अर्जुना यांनी ही गझल स्पर्धेत गायली तेव्हा सारे सभागृह स्तंभीत झाले. या स्पर्धेत अर्जुना यांना पहिला क्रमांक मिळाला. या कौतुकाच्या थापेनंतर सुरू झाला गझल गायनाचा अनोखा प्रवास.
       
                 पहिल्या गझलला लावलेल्या चालीचा किस्सा सांगताना दिनेश अर्जुना यांच्या डोळयात दिसत होता तो सत्तावीस वर्षांचा धडपडता पण सुरेल प्रवास. ज्या गझलला २७ वर्षांपूर्वी चाल लावली तीच गझल त्यांच्या पहिल्या वहिल्या अल्बममध्ये रसिकांना ऐकायला मिळते. या अल्बममधील आणखी एका गझलचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्या गझलचा मतला असा आहे


तुझ्या हासण्याचे दिवाणे किती
तुझे चाहते कोण जाणे किती


                  या अल्बममधील ही गझल म्हणजे वेगळी अनुभूती.राऊत सरांची ही गझल सर्वांच्या आवडीची तर आहेच. पण अर्जुना यांनी स्वतः संगीतबद्ध करून ती ज्या नजाकतीने गायली आहे त्यास तोड नाही. अर्जुना यांची गझल गायकी ऐकल्यानंतर त्यांच्यातील माणूसपणही तेवढयाच प्रकर्षाने जाणवते. जगण्यातील दुःख, वेदना, अन्याय,गरिबी , प्रेम, विरह या सर्व भावना गझलच्या प्रत्येक शेरातून व्यक्त होतात. पण नेमक्या स्वरांची साथ लाभली तरच अशा दर्जेदार रचना तयार होतात. त्या ऐकताना प्रत्येक स्वर व शब्द काळजाला जखम करतो. अशी भावावस्था होते तेव्हाच खर्‍या अर्थाने गझल जगता येते. ती अवस्था निर्माण करण्याचे शिवधनुष्य दिनेश अर्जुना यांनी लीलया उचलले आहे. हा गझल अल्बम त्यांच्या चाहत्यांनी स्वतः पैसे जमा करून काढला.त्यावरूनच त्यांचे स्वरसामर्थ्य दिसून येते. गझल गायक म्हणून कार्यरत असताना त्यांनी ’अर्धांगीनी’, ’दि रियल लाईफ ऑफ मंडी’, माय हजबन्डस् वाईफ’ या चित्रपटांनाही संगीत दिले आहे.’शुक्रीया’ हा उर्द्ू गझलांचा त्यांचा अल्बमही प्रसिद्ध झाला आहे.त्यांच्या पहिल्या वहिल्या मराठी गझल अल्बमला सुरेल आदाब...कट जाए मेरे सोच के पर_विवेक वाकळे


                                        


गझल हा अरेबिक शब्द. काव्यातून भावना व्यक्त करण्याचं ते एक सशक्त माघ्यम मानलं जातं. गझल म्हणजे स्त्रीशी केलेली गुफ्तगु म्हणजेच बातचित असा त्याचा सरळ सरळ शब्दश: अर्थ होतो. गझल  हा काव्य प्रकार  अरबांकडून भारतीयांना मिळाला आणि तो खर्‍या अर्थाने मोगलांच्या काळात उर्दूतून व्यक्त झाला. पारंपारिक गझलेत दोन मुख्य विषय आढळून येतात. १. प्रेम २. तत्वज्ञान आणि त्यासोबतच अध्यात्म, साकी-जाम, सामाजिकता आणि प्रेमसुलभ नाजुक भावभावना यांनासुद्घा तितकच महत्त्व आहे. उर्दू साहित्यात अनेक महान शायरांनी अनेक गझला लिहून उर्दू शायरीला अजरामर केलं. पण त्यामध्ये बहुतांश भरणा हा पुरूषी गझलकारांचाच दिसून येतो. पण उर्दू शायरीत स्त्रीया फारसे गझल किंवा कविता लिखाण करतांना आढळत नाहीत. किंवा त्यांच्या साहित्याला त्याकाळात प्रसिद्घ करण्याची मुभा त्या प्रस्थापित समाजरचनेला बहुधा मान्य नसावी असे दिसून  येते. उर्दू गझलेच्या इतिहासात फार फार तर उमराव जान ‘अदा’ नंतर कुणीच स्त्री गझलकार गझल लिहतांना दिसून  येत नाही. नंतरच्या आधुनिक काळात मात्र एकच नाव पुढे येते ते म्हणजे परवीन शाकीर यांचं. म्हणूनच एक उर्दू शायर स्त्रियांबद्दल आपल मत व्यक्त करतांना स्त्रियांमार्फत असे म्हणतो की, 

कुचाओ बाजार में कब जाती है
मेरी आवाज तो घर में ही दब जाती है

परवीन शाकीर यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९५२ साली पाकिस्तानातल्या कराची येथे झाला.परवीन शाकीर चे वडिल सैय्यद शाकीर अली हे पटना शहरात टेलीफोन खात्यात कार्यरत होते.सर सैय्यद गर्ल्स कॉलेज कराचीतून बी. ए. झाल्यानंतर कराची युनिर्व्हसिटीतून १९७२ साली त्या इंग्रजीत एम. ए.  झाल्या.१९७६ साली त्यांचा विवाह हा त्यांच्या मावशीचा मुलगा डॉ. नासीर अली यांच्या सोबत झाला.लग्नानंतर १९८० मध्ये त्यांनी भाषा विज्ञान मध्ये एम. ए. केले. त्यानंतर त्यांनी १० वर्षे अब्दुल्ला गर्ल्स कराची कॉलेज मध्ये अध्यापन कार्य केले. १९८२ साली पाकिस्तानी सिव्हिल सर्विस परिक्षेत दुसरे स्थान प्राप्त करून पाकिस्तानात सरकारी नोकरी केली. वयाच्या ४२ व्या वर्षी १९९४ मध्ये एका कार दुर्घटनेत त्यांना मृत्यू आला.एक महान उर्दू लेखिका, कवयित्री,शिक्षिका आणि पाकिस्तानी सिव्हिल सेविका म्हणून समाजात त्यांची प्रतिष्ठा होती.

           

परवीन शाकीर यांनी फार कमी वयात उत्कृष्ट लिखाणाला सुरुवात केली. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘खुशबू’  १९७६ ला प्रकाशित झाला. १९९० ला ‘इन्कार’ आणि  ‘कफे आईना’ आणि त्यानंतर लगेच ‘गोशा-ए-चश्म’ हे त्यांचे कविता आणि गझलसंग्रह पसिद्ध झाले.त्यांनी प्रारंभी उर्दू वर्तमानपत्रातून आणि नंतर इंग्रजी समाचारपत्रातून स्तंभलेखनाला सुरुवात केली.त्यांच्या ‘खुशबू’ या काव्यसंग्रहाला पाकिस्तानी साहित्याच्या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित केल्या गेले. त्यानंतर त्यांनी मुक्त छंदात्मक आणि गझल या दोन्ही काव्यप्रकारात लेखन केले. 
त्यांच्या कवितांचे आणि गझलांचे मुख्य विषय म्हणजे प्रेम, नारीवाद-आणि सामाजिक कलंक. प्रेम आणि सौंदर्यात समाजातील आंतरविरोधी अवधारणांचा शोध त्यांनी आपल्या गझलांमधून घेतला.आत्मीक बलाचा आधार आणि सहज सुंदर प्रतिमा हे त्यांच्या गझलांचे विशेष. समालोचकांच्या दृष्टीतून परवीन शाकीर यांच्या गझलात आधुनिक संवेदनशीलते सोबतच शास्त्रीय परंपराचं समायोजन आढळतं. 
परवीन शाकीर यांच्या गझलेतील स्त्री  प्रणय आणि प्रेमसुलभ अदा पुरूषांसाठी समर्पक शब्दात व्यक्त करताना दिसते.रवायती उर्दू शायरीत जसं प्रेयसीच्या सौदर्याचं वर्णन,‘तिच्या’ अदांनी ‘त्यांच’ घायल होणं,‘तिच्या’ अस्तित्वाने जणू ‘त्यांच’ जीवन बदलून जाणं येतं.एखाद्या स्त्रीच्या प्रेमात तिला खुदा समजून इबादत करण्याइतपत उर्दू शायरीत उत्कट भाव दिसून येतो. अगदी त्याला तोडीस तोड अशा पुरूषांच्या प्रेमाबद्दलच्या  भावना परवीन शाकीर  यांनी आपल्या शायरीत मांडलेल्या दिसून येतात.मेहदी हसनने गायलेल्या एका प्रसिद्घ गझलेच्या मतल्यात त्या म्हणतात-

कु-ब-कु फैल गई बात शनासाई की
उसने खुशबू की तरह मेरी पजीराई की

या शेरात परवीन शाकीर असे म्हणतात की, त्याच्या माझ्या वाढत्या भेटीगाठीची आणि आमच्यातील संबंधाची चर्चा सगळीकडेच वार्‍यासारखी पसरली आहे.पण तरीसुद्घा माझ्या प्रियकराने एखाद्या अलौकिक सुगंधाप्रमाणे माझा स्वीकार केला.पुरूष प्रेमाचे औदार्य आणि त्याप्रती एका स्त्रीचा विश्वास, अभिमान व्यक्त करणारा अशाच स्वरूपाचा आणखी एक शेर-.

उसने जलती हुई पेशानी पे जब हाथ रखा
रूह तक आ गई तासीर मसिहाई की

मी आजारी असताना जेव्हा माझ्या तापलेल्या कपाळावर माझ्या प्रियकराच्या हाताचा स्पर्श झाला त्या स्पर्शाची अनुभूती इतकी विलक्षण होती की, त्यामुळे मला एक भावनिक आधारच नाही पण एक वेगळं शारीरिक समाधानही लाभलं.माझ्या मनाला आणि हृदयाला शांती लाभली. माझ्या बेचैन आत्म्यास परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं.
देश बदलला,काळ बदलला,धर्म बदलला,तरी मानवी भावभावना मात्र त्याच आसतात.वरील शेरात परवीन शाकीर यांनी बयाँ केलेली स्त्री-भावना जशीच्या तशी श्रीकृष्ण राऊत यांच्या एका मुक्तकात पुरुषाची होते आणि  ‘चंदनाचा शीतल स्पर्श’ घेऊन येते ती अशी-

माझे जळते मस्तक 
फुटू पाहते क्षणात;
ठेव कपाळावरती
तुझा चंदनाचा हात.

परवीन शाकीर यांच्या  शायरीत कधी विरहाचं दु:ख येतं, तर कधी अधुर्‍या प्रेमाची मनात राहिलेली खंत-

अब तो इस राह से वह शख्स गुजरता भी नही
अब किस उम्मीद पे दरवाजे से झाँके कोई

प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकर-प्रेयसीत अचानक काही कारणास्तव दुरावा निर्मान होतो.संबंधात कटुतायेते.रोज तिच्या घराभोवती घिरट्या घालणारा प्रियकराचे येणे-जाणे अचानक बंद होते.प्रेयसी अत्यंत नाराज होते.आता तेव्हा ती म्हणते, मी कोणत्या आशेने दरवाजातून डोकावून पाहू. 
कधी कधी प्रेमात प्रेयसी आपलं सर्वस्व प्रियकराला अर्पण करते. माझं सर्व त्याचं आहे माझ्या सर्व कार्यावर आता माझं नाही तर त्याचच नियंत्रण आहे. असं तिला वाटत-

चेहरा मेरा था निगाहे उसकी
खामुशी में भी वो बाते उसकी

या शेरात त्या म्हणतात की, हा चेहरा माझा असला तरी त्या चेहर्‍याला न्याहळणारे डोळे त्याचे आहेत. आणि त्याच्यापासून जेव्हाही ‘ती’ दूर असते तेव्हा ही ती ‘त्याच्याच’ विचारात मग्न असते.‘गझल’ आणि ‘शेर’ ह्या काव्यात्म प्रतिमा घेऊन येणारा हा आणखी एक सुंदर शेर-
मेरे चेहरे पे गजल लिखती गई
शेर कहती हुई आँखे उसकी

गझलेत मुख्यत्वेकरून प्रियकर हा प्रेयसीची तारीफ  करतो अशा अर्थाने परवीन शाकीर म्हणतात‘तो’माझ्या चेहर्‍यावर गझल लिहित, माझ्या सौंदर्याची प्रशंसा करतो. 
प्रेम हे शरीर आणि मन या दोन्ही गोष्टीतून व्यक्त होते. आधी शरीराचे आकर्षण आणि नंतर मनोमीलन.जेव्हा प्रियकर त्यांना मिठीत होतो तेव्हा तो पुढे काय करील याचा अंदाज ही त्यांना घेता येतो.ह्या तरल,नाजुक भावना  परवीन शाकीर सूचकतेने व्यक्त करतात-

शोख लम्हो का पता देने लगी
तेज होती हुई साँसे उसकी

‘तेज होती हुई साँसे उसकी’ यात सर्वच आलं.यावर वेगळं भाष्य करण्याची काहीच गर नाही.

प्रेमाच्या विविध छटा आपल्या शायरीत व्यक्त करतांना त्या लिहतात-

निंद इस सोच में टूटी अक्सर
किस तरहा कटती है राते उसकी

   ताटा्तूट झाल्यामुळे प्रेयसीला प्रियकराची वारंवार आठवण येते आणि त्याचीच काळजी वाटते ती म्हणजे की, माझी झोप वारंवार याच काळजीने तुटते की, माझ्या वियोगात तो कशी रात्र घालवत असेल. माझ्याशिवाय त्याची काय अवस्था झाली असेल?
परवीन शाकीर यांच्या गजलेत स्त्रीसुलभ प्रेमभावना व्यक्त करणारे बरेच शेर आहेत. त्यापैकी हा एक शेर प्रेमाची उत्कट ओढ घेऊन आलेला- 

दुर रहकर भी सदा रहती है
मुझको थामे हुऐ बाँहे उसकी

एखाद्या व्यक्तीचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो आणि त्याच्या सहवासाची अशी सवय झाली की आपण कितीही ठरवलं तरी सवयीनुसार चुका करतोच-

उंगलीयोको तराश दू फिर भी
आदतन उसका नाम लिखेगी

दगडातून एखादं शिल्प कोरताना दगडाचा अनावश्यक भाग जसा छन्नी-हातोड्याने उडवतात तसं मी माझ्या बोटांना छाटून टाकलं तरी ही बोटं सवयीनुसार त्याचंच ‘नाव’ लिहितील!
पूर्वीच्या प्रेमाची,‘त्याच्या’ सहवासाची,अस्तित्वाची जाणीव ‘तिच्या’ जीवनात इतकी पक्की आणि घट्ट आहे की ती काही करता तिला पुसता येणार नाही. ही जाणीव तिच्या अंतरंगात खोलवर रूजली आहे असे तिला वाटते.
आतापर्यंत परवीन शाकीर यांच्या गजलेतील आपण एकच बा्जू पाहिली. दुसरी बाजु म्हणजे पुरूषांनी स्त्रीयांचे केलेले शोषण .त्यांना भावनांशी खेळून त्यांना दिलेल्या यातना, दगाबाजी, स्वार्थीपणा, विश्वासघात इत्यादीचा  उलगडा त्यांच्या शायरीत अगदी निर्भीड पणे आणि अत्यंत धीटपणे आला आहे.पुरूषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना दिलेले दु:ख,समस्या आणि त्यांच्या भोळ्या भावनांचा घेतलेला गैरफायदा इत्यादी नवविचार त्या प्रभावीपणे शब्दबद्ध करतात-

वो तो खुशबू है, हवाओं में बिखर जाये
मसला फूल का है फूल किधर जायेगा

परवीन शाकीर यांचा वरील शेर वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला भिडतो. पुरूषाने केलेले स्त्रीचे शोषण मग ते भावनिक असो शारीरिक असो वा मानसिक किंवा लैंगिक असो ते एकदम परखड शब्दात त्यांनी मांडले.शोषित फुल कुठे जाईल?त्याचा स्वीकार कोण करेल?ह्या प्रश्नाचे उत्तर कोणत्या समाजाजवळ आहे?हे एव्हढ्यावरच थांबत नाही,विवाहातील अनिष्ट रूढी, परंपरा आणि पुरूषी अहंकार आणि शेवटी ‘तलाक’-

दे तो रहे हो तलाक गुरूर -ओ- कहर के साथ
मेरा शबाब भी लौटा दो मेरे मेहेर के साथ

तलाक म्हणजे घटस्फोट एखाद्या विवाहित स्त्रीला पुरूषाने दिलेला. घटस्फोटानंतर ‘ती’ म्हणते तुम्ही मला तलाक देत आहात द्या.तुम्हाला माझा ‘मेहेर’ म्हणजे स्त्रीने दिलेली संपत्ती तुम्हाला परत करावी लागेल.तुम्ही तीही परत कराल पण मी तुम्हाला दिलेले माझे तारूण्य? ते परत करता येईल का तुम्हाला त्या मेहेरसोबत?
प्रेमात ‘ब्रेकअप’ होणं ही साहजिक गोष्ट आहे; पण एखाद्या दगाबाज प्रियकराने हेतुपुरस्सर आपला स्वार्थ साधला आणि नंतर त्या भोळ्या-भाबड्या प्रेयसीचा त्याग केला तर त्यामुळे तिची अवस्था इतकी दयनीय होते की ती तिचे दु:ख ती कोणाला सांगू शकत नाही. कारण त्या दोघांमधल्या संबंधाची चर्चा जर कुणासोबत केली तर तिचीच बदनामी होईल-

कैसे कह दू की मुझे छोड दिया है उसने
बात तो सच है मगर बात है रुसवाई की

प्रेयसीच्या दु:खाची जाणीव तिच्यावर प्रेम करणार्‍या प्रियकराला कधीच होत नाही त्याला तिची काळजीच नाही तर त्याला तिचे दु:ख कसे कळणार?-

धूप में बारिश होते देख के हैरत करने वाले
शायद तुने मेरी हँसी को छूकर कभी नही देखा

  उन्हात अचानक पाऊस आल्यामुळे तुला आश्चर्य वाटते ‘शायद तुने मेरी हँसी को छुकर कभी नही देखा’ म्हणजे तू माझ्या चेहर्‍यावरचे हास्य बघितले पण त्या हसण्याला स्पर्श करून पाहिले नाही. हा जो भर उन्हात अवेळी पाऊस कोसळत आहे तो माझ्या दु:खामुळे कोसळतो आहे.
असे कितीतरी शेर त्यांच्या गझलेत येतात.मिसाल के तौर पर-

अक्से-खुशबू हू बिखरने से न रोको कोई
और बिखर जाऊ तो मुझको न समेटे कोई

काँप उठती हूँ मैं ये सोचके तनहाई में
मेरे चेहरे पे तेरा नाम न पढ ले कोई

वरील त्यांच्या गझलेच्या चार ओळीत पहिल्या दोन ओळीत स्वत:च्या दु:खाबद्दल त्या भावना व्यक्त करतात पण नंतरच्या दोन ओळीत मात्र त्यांना काळजी वाटते;समाजाला तिच्या आणि त्याच्या संबंधाची जर माहिती झाली तर हा समाज माझं जगणं मुश्कील करून टाकेल.ह्या काळजीने अथवा नुसत्या विचारानेही तिचे अंग एकांतात थरथरते.
समाजव्यवस्थेत स्त्रीचा विविध अंगानी झालेला कोंडमारा परवीन शाकीर यांच्या गझलांमधून उत्कटपणे उजागर होतो. वाचताना आपण बेचैन होतो.काही व्यक्ती इतक्या मतलबी असतात की त्यांना इतरांचं काहीच देणं-घेणं नसतं.परवीन शाकीर यांनी त्यांच्या शायरीतून विचारलेले प्रश्न हे जगातल्या तमाम पुरुषांना विचारलेले आहेत. आपण त्यापैकी एक असल्याने आपण अस्वथ होतो.कारण आपण निरूत्तर असतो-

टूटी है मेरी नींद मगर तुमको इससे क्या?
बजते रहे हवाओ से दर,तुमको इससे क्या?

तुम मौज-मौज मिस्ल-ए-सबा घुमते रहो 
कट जाए मेरे सोच के पर तुमको इससे क्या?

तू तिकडे मिस्ल-ए--सबा म्हणजे शीतल वार्‍यासारखा,मौज-मौज म्हणजे खुशाल हिंडत रहा. माझ्या विचारांचे पंख इकडे खुडलेत...तरी तुला त्याचे काय?

चार गझला_खलील मोमीन
१.

बाप 

कष्ट करणे हाच त्याच्या जीवनाला शाप होता;
सोसला तो ताप ज्याने तोच माझा बाप होता.

वामकुक्षी काय त्याला ना कधी माहीत झाली;
वेळही कामात त्याचा जात आपोआप होता. 

व्यग्रता कामात होती नम्रता वाणीत त्याच्या;
हात त्याचा साधनांशी मूक वार्तालाप होता!

कष्ट करण्याचीच दीक्षा,ना कशाचीही अपेक्षा;
जे मिळाले त्या फळाची खात थोडी खाप होता.

त्या स्मृतींना पेलतांना शब्द गर्वाने म्हणाले-
बाप कामाला तुझा रे वाटलेला व्याप होता!

वाकला कष्टामुळे तो थांबला नाही तरीही;
तो क्षणांना धावणार्‍या लागलेली धाप होता!

२.
                                    
भर अजून 

भावले न तिजला हे शब्दांचे घर अजून;
अक्षरास म्हणते ती ,व्यर्थाची बर अजून.

धन्यताच डुचमळते आहे ती बघ तुझ्यात;
मी न दिला कसलाही श्रद्धेला वर अजून.

वृत्त,छंद, यमकांची छत्री का रे करात ;
काय सांग पडली का उर्मीची सर अजून?

ना मुळीच भिजले रे गाण्याने अंतरंग;
वेदनेस भिडला ना खर्जाचा स्वर अजून.

बावरून म्हणते ती अंगाला चाचपीत;
रे तुला न चढला त्या ध्यासाचा ज्वर अजून!

तापलास म्हणतो ना वाफेचा होत मेघ;
रिक्त सांग दिसते का माझे अंबर अजून?

प्रेम फार हलके ते वार्‍यानेही उडेल;
त्यात घाल विरहाच्या दु:खाची भर अजून!

३.
                     
कुंकवाची कुंपणे 

सोसते धरती किती;
पोसते भरती किती!

माणसे सगळीकडे;
त्यातली करती किती?

कुंकवाची कुंपणे;
आतल्या गरती किती?

योजना भरल्या पुर्‍या;
त्यातल्या झरती किती. 

पोट ते भरले तरी;
भ्रष्ट हे चरती किती!

सारखे ढकला तळी;
ते बघा तरती किती!

धावती सुख शोधण्या-
त्यामुळे मरती  किती.

उत्तरे मिळतात ना;
प्रश्न हे सरती किती.

चोरही धरले इथे-
ते छुपे वरती किती!

ते खरे बोलूनही;
बावळे ठरती किती.

दु:खही पचते इथे -
वेदना हरती किती! 

४.

विरक्त 

म्हणू नकोस ते कसे कधी मला जमायचे;
फुलासमान वाग तू;जमेल घमघमायचे.

खुणावतेय ते तुला तरी पुढेच धावते;
अशा सुखास गाठण्या उगाच का दमायचे?

तयार उत्तरे जरी नकोच आढयता उरी;
समोर प्रश्न ठाकता तयापुढे नमायचे.

बघून घे नभास त्या अलिप्त सर्व व्यापुनी;
विरक्त राहुनी तसे जगात या रमायचे.

दिव्यात तेल वात ही तसाच जन्म आपुला;
तमास पेलण्यास या जळून रे शमायचे.