गझल हा अरेबिक शब्द. काव्यातून भावना व्यक्त करण्याचं ते एक सशक्त माघ्यम मानलं जातं. गझल म्हणजे स्त्रीशी केलेली गुफ्तगु म्हणजेच बातचित असा त्याचा सरळ सरळ शब्दश: अर्थ होतो. गझल हा काव्य प्रकार अरबांकडून भारतीयांना मिळाला आणि तो खर्या अर्थाने मोगलांच्या काळात उर्दूतून व्यक्त झाला. पारंपारिक गझलेत दोन मुख्य विषय आढळून येतात. १. प्रेम २. तत्वज्ञान आणि त्यासोबतच अध्यात्म, साकी-जाम, सामाजिकता आणि प्रेमसुलभ नाजुक भावभावना यांनासुद्घा तितकच महत्त्व आहे. उर्दू साहित्यात अनेक महान शायरांनी अनेक गझला लिहून उर्दू शायरीला अजरामर केलं. पण त्यामध्ये बहुतांश भरणा हा पुरूषी गझलकारांचाच दिसून येतो. पण उर्दू शायरीत स्त्रीया फारसे गझल किंवा कविता लिखाण करतांना आढळत नाहीत. किंवा त्यांच्या साहित्याला त्याकाळात प्रसिद्घ करण्याची मुभा त्या प्रस्थापित समाजरचनेला बहुधा मान्य नसावी असे दिसून येते. उर्दू गझलेच्या इतिहासात फार फार तर उमराव जान ‘अदा’ नंतर कुणीच स्त्री गझलकार गझल लिहतांना दिसून येत नाही. नंतरच्या आधुनिक काळात मात्र एकच नाव पुढे येते ते म्हणजे परवीन शाकीर यांचं. म्हणूनच एक उर्दू शायर स्त्रियांबद्दल आपल मत व्यक्त करतांना स्त्रियांमार्फत असे म्हणतो की,
कुचाओ बाजार में कब जाती है
मेरी आवाज तो घर में ही दब जाती है
परवीन शाकीर यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९५२ साली पाकिस्तानातल्या कराची येथे झाला.परवीन शाकीर चे वडिल सैय्यद शाकीर अली हे पटना शहरात टेलीफोन खात्यात कार्यरत होते.सर सैय्यद गर्ल्स कॉलेज कराचीतून बी. ए. झाल्यानंतर कराची युनिर्व्हसिटीतून १९७२ साली त्या इंग्रजीत एम. ए. झाल्या.१९७६ साली त्यांचा विवाह हा त्यांच्या मावशीचा मुलगा डॉ. नासीर अली यांच्या सोबत झाला.लग्नानंतर १९८० मध्ये त्यांनी भाषा विज्ञान मध्ये एम. ए. केले. त्यानंतर त्यांनी १० वर्षे अब्दुल्ला गर्ल्स कराची कॉलेज मध्ये अध्यापन कार्य केले. १९८२ साली पाकिस्तानी सिव्हिल सर्विस परिक्षेत दुसरे स्थान प्राप्त करून पाकिस्तानात सरकारी नोकरी केली. वयाच्या ४२ व्या वर्षी १९९४ मध्ये एका कार दुर्घटनेत त्यांना मृत्यू आला.एक महान उर्दू लेखिका, कवयित्री,शिक्षिका आणि पाकिस्तानी सिव्हिल सेविका म्हणून समाजात त्यांची प्रतिष्ठा होती.
परवीन शाकीर यांनी फार कमी वयात उत्कृष्ट लिखाणाला सुरुवात केली. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘खुशबू’ १९७६ ला प्रकाशित झाला. १९९० ला ‘इन्कार’ आणि ‘कफे आईना’ आणि त्यानंतर लगेच ‘गोशा-ए-चश्म’ हे त्यांचे कविता आणि गझलसंग्रह पसिद्ध झाले.त्यांनी प्रारंभी उर्दू वर्तमानपत्रातून आणि नंतर इंग्रजी समाचारपत्रातून स्तंभलेखनाला सुरुवात केली.त्यांच्या ‘खुशबू’ या काव्यसंग्रहाला पाकिस्तानी साहित्याच्या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित केल्या गेले. त्यानंतर त्यांनी मुक्त छंदात्मक आणि गझल या दोन्ही काव्यप्रकारात लेखन केले.
त्यांच्या कवितांचे आणि गझलांचे मुख्य विषय म्हणजे प्रेम, नारीवाद-आणि सामाजिक कलंक. प्रेम आणि सौंदर्यात समाजातील आंतरविरोधी अवधारणांचा शोध त्यांनी आपल्या गझलांमधून घेतला.आत्मीक बलाचा आधार आणि सहज सुंदर प्रतिमा हे त्यांच्या गझलांचे विशेष. समालोचकांच्या दृष्टीतून परवीन शाकीर यांच्या गझलात आधुनिक संवेदनशीलते सोबतच शास्त्रीय परंपराचं समायोजन आढळतं.
परवीन शाकीर यांच्या गझलेतील स्त्री प्रणय आणि प्रेमसुलभ अदा पुरूषांसाठी समर्पक शब्दात व्यक्त करताना दिसते.रवायती उर्दू शायरीत जसं प्रेयसीच्या सौदर्याचं वर्णन,‘तिच्या’ अदांनी ‘त्यांच’ घायल होणं,‘तिच्या’ अस्तित्वाने जणू ‘त्यांच’ जीवन बदलून जाणं येतं.एखाद्या स्त्रीच्या प्रेमात तिला खुदा समजून इबादत करण्याइतपत उर्दू शायरीत उत्कट भाव दिसून येतो. अगदी त्याला तोडीस तोड अशा पुरूषांच्या प्रेमाबद्दलच्या भावना परवीन शाकीर यांनी आपल्या शायरीत मांडलेल्या दिसून येतात.मेहदी हसनने गायलेल्या एका प्रसिद्घ गझलेच्या मतल्यात त्या म्हणतात-
कु-ब-कु फैल गई बात शनासाई की
उसने खुशबू की तरह मेरी पजीराई की
या शेरात परवीन शाकीर असे म्हणतात की, त्याच्या माझ्या वाढत्या भेटीगाठीची आणि आमच्यातील संबंधाची चर्चा सगळीकडेच वार्यासारखी पसरली आहे.पण तरीसुद्घा माझ्या प्रियकराने एखाद्या अलौकिक सुगंधाप्रमाणे माझा स्वीकार केला.पुरूष प्रेमाचे औदार्य आणि त्याप्रती एका स्त्रीचा विश्वास, अभिमान व्यक्त करणारा अशाच स्वरूपाचा आणखी एक शेर-.
उसने जलती हुई पेशानी पे जब हाथ रखा
रूह तक आ गई तासीर मसिहाई की
मी आजारी असताना जेव्हा माझ्या तापलेल्या कपाळावर माझ्या प्रियकराच्या हाताचा स्पर्श झाला त्या स्पर्शाची अनुभूती इतकी विलक्षण होती की, त्यामुळे मला एक भावनिक आधारच नाही पण एक वेगळं शारीरिक समाधानही लाभलं.माझ्या मनाला आणि हृदयाला शांती लाभली. माझ्या बेचैन आत्म्यास परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं.
देश बदलला,काळ बदलला,धर्म बदलला,तरी मानवी भावभावना मात्र त्याच आसतात.वरील शेरात परवीन शाकीर यांनी बयाँ केलेली स्त्री-भावना जशीच्या तशी श्रीकृष्ण राऊत यांच्या एका मुक्तकात पुरुषाची होते आणि ‘चंदनाचा शीतल स्पर्श’ घेऊन येते ती अशी-
माझे जळते मस्तक
फुटू पाहते क्षणात;
ठेव कपाळावरती
तुझा चंदनाचा हात.
परवीन शाकीर यांच्या शायरीत कधी विरहाचं दु:ख येतं, तर कधी अधुर्या प्रेमाची मनात राहिलेली खंत-
अब तो इस राह से वह शख्स गुजरता भी नही
अब किस उम्मीद पे दरवाजे से झाँके कोई
प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकर-प्रेयसीत अचानक काही कारणास्तव दुरावा निर्मान होतो.संबंधात कटुतायेते.रोज तिच्या घराभोवती घिरट्या घालणारा प्रियकराचे येणे-जाणे अचानक बंद होते.प्रेयसी अत्यंत नाराज होते.आता तेव्हा ती म्हणते, मी कोणत्या आशेने दरवाजातून डोकावून पाहू.
कधी कधी प्रेमात प्रेयसी आपलं सर्वस्व प्रियकराला अर्पण करते. माझं सर्व त्याचं आहे माझ्या सर्व कार्यावर आता माझं नाही तर त्याचच नियंत्रण आहे. असं तिला वाटत-
चेहरा मेरा था निगाहे उसकी
खामुशी में भी वो बाते उसकी
या शेरात त्या म्हणतात की, हा चेहरा माझा असला तरी त्या चेहर्याला न्याहळणारे डोळे त्याचे आहेत. आणि त्याच्यापासून जेव्हाही ‘ती’ दूर असते तेव्हा ही ती ‘त्याच्याच’ विचारात मग्न असते.‘गझल’ आणि ‘शेर’ ह्या काव्यात्म प्रतिमा घेऊन येणारा हा आणखी एक सुंदर शेर-
मेरे चेहरे पे गजल लिखती गई
शेर कहती हुई आँखे उसकी
गझलेत मुख्यत्वेकरून प्रियकर हा प्रेयसीची तारीफ करतो अशा अर्थाने परवीन शाकीर म्हणतात‘तो’माझ्या चेहर्यावर गझल लिहित, माझ्या सौंदर्याची प्रशंसा करतो.
प्रेम हे शरीर आणि मन या दोन्ही गोष्टीतून व्यक्त होते. आधी शरीराचे आकर्षण आणि नंतर मनोमीलन.जेव्हा प्रियकर त्यांना मिठीत होतो तेव्हा तो पुढे काय करील याचा अंदाज ही त्यांना घेता येतो.ह्या तरल,नाजुक भावना परवीन शाकीर सूचकतेने व्यक्त करतात-
शोख लम्हो का पता देने लगी
तेज होती हुई साँसे उसकी
‘तेज होती हुई साँसे उसकी’ यात सर्वच आलं.यावर वेगळं भाष्य करण्याची काहीच गर नाही.
प्रेमाच्या विविध छटा आपल्या शायरीत व्यक्त करतांना त्या लिहतात-
निंद इस सोच में टूटी अक्सर
किस तरहा कटती है राते उसकी
ताटा्तूट झाल्यामुळे प्रेयसीला प्रियकराची वारंवार आठवण येते आणि त्याचीच काळजी वाटते ती म्हणजे की, माझी झोप वारंवार याच काळजीने तुटते की, माझ्या वियोगात तो कशी रात्र घालवत असेल. माझ्याशिवाय त्याची काय अवस्था झाली असेल?
परवीन शाकीर यांच्या गजलेत स्त्रीसुलभ प्रेमभावना व्यक्त करणारे बरेच शेर आहेत. त्यापैकी हा एक शेर प्रेमाची उत्कट ओढ घेऊन आलेला-
दुर रहकर भी सदा रहती है
मुझको थामे हुऐ बाँहे उसकी
एखाद्या व्यक्तीचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो आणि त्याच्या सहवासाची अशी सवय झाली की आपण कितीही ठरवलं तरी सवयीनुसार चुका करतोच-
उंगलीयोको तराश दू फिर भी
आदतन उसका नाम लिखेगी
दगडातून एखादं शिल्प कोरताना दगडाचा अनावश्यक भाग जसा छन्नी-हातोड्याने उडवतात तसं मी माझ्या बोटांना छाटून टाकलं तरी ही बोटं सवयीनुसार त्याचंच ‘नाव’ लिहितील!
पूर्वीच्या प्रेमाची,‘त्याच्या’ सहवासाची,अस्तित्वाची जाणीव ‘तिच्या’ जीवनात इतकी पक्की आणि घट्ट आहे की ती काही करता तिला पुसता येणार नाही. ही जाणीव तिच्या अंतरंगात खोलवर रूजली आहे असे तिला वाटते.
आतापर्यंत परवीन शाकीर यांच्या गजलेतील आपण एकच बा्जू पाहिली. दुसरी बाजु म्हणजे पुरूषांनी स्त्रीयांचे केलेले शोषण .त्यांना भावनांशी खेळून त्यांना दिलेल्या यातना, दगाबाजी, स्वार्थीपणा, विश्वासघात इत्यादीचा उलगडा त्यांच्या शायरीत अगदी निर्भीड पणे आणि अत्यंत धीटपणे आला आहे.पुरूषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना दिलेले दु:ख,समस्या आणि त्यांच्या भोळ्या भावनांचा घेतलेला गैरफायदा इत्यादी नवविचार त्या प्रभावीपणे शब्दबद्ध करतात-
वो तो खुशबू है, हवाओं में बिखर जाये
मसला फूल का है फूल किधर जायेगा
परवीन शाकीर यांचा वरील शेर वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला भिडतो. पुरूषाने केलेले स्त्रीचे शोषण मग ते भावनिक असो शारीरिक असो वा मानसिक किंवा लैंगिक असो ते एकदम परखड शब्दात त्यांनी मांडले.शोषित फुल कुठे जाईल?त्याचा स्वीकार कोण करेल?ह्या प्रश्नाचे उत्तर कोणत्या समाजाजवळ आहे?हे एव्हढ्यावरच थांबत नाही,विवाहातील अनिष्ट रूढी, परंपरा आणि पुरूषी अहंकार आणि शेवटी ‘तलाक’-
दे तो रहे हो तलाक गुरूर -ओ- कहर के साथ
मेरा शबाब भी लौटा दो मेरे मेहेर के साथ
तलाक म्हणजे घटस्फोट एखाद्या विवाहित स्त्रीला पुरूषाने दिलेला. घटस्फोटानंतर ‘ती’ म्हणते तुम्ही मला तलाक देत आहात द्या.तुम्हाला माझा ‘मेहेर’ म्हणजे स्त्रीने दिलेली संपत्ती तुम्हाला परत करावी लागेल.तुम्ही तीही परत कराल पण मी तुम्हाला दिलेले माझे तारूण्य? ते परत करता येईल का तुम्हाला त्या मेहेरसोबत?
प्रेमात ‘ब्रेकअप’ होणं ही साहजिक गोष्ट आहे; पण एखाद्या दगाबाज प्रियकराने हेतुपुरस्सर आपला स्वार्थ साधला आणि नंतर त्या भोळ्या-भाबड्या प्रेयसीचा त्याग केला तर त्यामुळे तिची अवस्था इतकी दयनीय होते की ती तिचे दु:ख ती कोणाला सांगू शकत नाही. कारण त्या दोघांमधल्या संबंधाची चर्चा जर कुणासोबत केली तर तिचीच बदनामी होईल-
कैसे कह दू की मुझे छोड दिया है उसने
बात तो सच है मगर बात है रुसवाई की
कैसे कह दू की मुझे छोड दिया है उसने
बात तो सच है मगर बात है रुसवाई की
प्रेयसीच्या दु:खाची जाणीव तिच्यावर प्रेम करणार्या प्रियकराला कधीच होत नाही त्याला तिची काळजीच नाही तर त्याला तिचे दु:ख कसे कळणार?-
धूप में बारिश होते देख के हैरत करने वाले
शायद तुने मेरी हँसी को छूकर कभी नही देखा
उन्हात अचानक पाऊस आल्यामुळे तुला आश्चर्य वाटते ‘शायद तुने मेरी हँसी को छुकर कभी नही देखा’ म्हणजे तू माझ्या चेहर्यावरचे हास्य बघितले पण त्या हसण्याला स्पर्श करून पाहिले नाही. हा जो भर उन्हात अवेळी पाऊस कोसळत आहे तो माझ्या दु:खामुळे कोसळतो आहे.
असे कितीतरी शेर त्यांच्या गझलेत येतात.मिसाल के तौर पर-
अक्से-खुशबू हू बिखरने से न रोको कोई
और बिखर जाऊ तो मुझको न समेटे कोई
काँप उठती हूँ मैं ये सोचके तनहाई में
मेरे चेहरे पे तेरा नाम न पढ ले कोई
वरील त्यांच्या गझलेच्या चार ओळीत पहिल्या दोन ओळीत स्वत:च्या दु:खाबद्दल त्या भावना व्यक्त करतात पण नंतरच्या दोन ओळीत मात्र त्यांना काळजी वाटते;समाजाला तिच्या आणि त्याच्या संबंधाची जर माहिती झाली तर हा समाज माझं जगणं मुश्कील करून टाकेल.ह्या काळजीने अथवा नुसत्या विचारानेही तिचे अंग एकांतात थरथरते.
समाजव्यवस्थेत स्त्रीचा विविध अंगानी झालेला कोंडमारा परवीन शाकीर यांच्या गझलांमधून उत्कटपणे उजागर होतो. वाचताना आपण बेचैन होतो.काही व्यक्ती इतक्या मतलबी असतात की त्यांना इतरांचं काहीच देणं-घेणं नसतं.परवीन शाकीर यांनी त्यांच्या शायरीतून विचारलेले प्रश्न हे जगातल्या तमाम पुरुषांना विचारलेले आहेत. आपण त्यापैकी एक असल्याने आपण अस्वथ होतो.कारण आपण निरूत्तर असतो-
टूटी है मेरी नींद मगर तुमको इससे क्या?
बजते रहे हवाओ से दर,तुमको इससे क्या?
तुम मौज-मौज मिस्ल-ए-सबा घुमते रहो
कट जाए मेरे सोच के पर तुमको इससे क्या?
तू तिकडे मिस्ल-ए--सबा म्हणजे शीतल वार्यासारखा,मौज-मौज म्हणजे खुशाल हिंडत रहा. माझ्या विचारांचे पंख इकडे खुडलेत...तरी तुला त्याचे काय?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा