चार गझला_खलील मोमीन




१.

बाप 

कष्ट करणे हाच त्याच्या जीवनाला शाप होता;
सोसला तो ताप ज्याने तोच माझा बाप होता.

वामकुक्षी काय त्याला ना कधी माहीत झाली;
वेळही कामात त्याचा जात आपोआप होता. 

व्यग्रता कामात होती नम्रता वाणीत त्याच्या;
हात त्याचा साधनांशी मूक वार्तालाप होता!

कष्ट करण्याचीच दीक्षा,ना कशाचीही अपेक्षा;
जे मिळाले त्या फळाची खात थोडी खाप होता.

त्या स्मृतींना पेलतांना शब्द गर्वाने म्हणाले-
बाप कामाला तुझा रे वाटलेला व्याप होता!

वाकला कष्टामुळे तो थांबला नाही तरीही;
तो क्षणांना धावणार्‍या लागलेली धाप होता!

२.
                                    
भर अजून 

भावले न तिजला हे शब्दांचे घर अजून;
अक्षरास म्हणते ती ,व्यर्थाची बर अजून.

धन्यताच डुचमळते आहे ती बघ तुझ्यात;
मी न दिला कसलाही श्रद्धेला वर अजून.

वृत्त,छंद, यमकांची छत्री का रे करात ;
काय सांग पडली का उर्मीची सर अजून?

ना मुळीच भिजले रे गाण्याने अंतरंग;
वेदनेस भिडला ना खर्जाचा स्वर अजून.

बावरून म्हणते ती अंगाला चाचपीत;
रे तुला न चढला त्या ध्यासाचा ज्वर अजून!

तापलास म्हणतो ना वाफेचा होत मेघ;
रिक्त सांग दिसते का माझे अंबर अजून?

प्रेम फार हलके ते वार्‍यानेही उडेल;
त्यात घाल विरहाच्या दु:खाची भर अजून!

३.
                     
कुंकवाची कुंपणे 

सोसते धरती किती;
पोसते भरती किती!

माणसे सगळीकडे;
त्यातली करती किती?

कुंकवाची कुंपणे;
आतल्या गरती किती?

योजना भरल्या पुर्‍या;
त्यातल्या झरती किती. 

पोट ते भरले तरी;
भ्रष्ट हे चरती किती!

सारखे ढकला तळी;
ते बघा तरती किती!

धावती सुख शोधण्या-
त्यामुळे मरती  किती.

उत्तरे मिळतात ना;
प्रश्न हे सरती किती.

चोरही धरले इथे-
ते छुपे वरती किती!

ते खरे बोलूनही;
बावळे ठरती किती.

दु:खही पचते इथे -
वेदना हरती किती! 

४.

विरक्त 

म्हणू नकोस ते कसे कधी मला जमायचे;
फुलासमान वाग तू;जमेल घमघमायचे.

खुणावतेय ते तुला तरी पुढेच धावते;
अशा सुखास गाठण्या उगाच का दमायचे?

तयार उत्तरे जरी नकोच आढयता उरी;
समोर प्रश्न ठाकता तयापुढे नमायचे.

बघून घे नभास त्या अलिप्त सर्व व्यापुनी;
विरक्त राहुनी तसे जगात या रमायचे.

दिव्यात तेल वात ही तसाच जन्म आपुला;
तमास पेलण्यास या जळून रे शमायचे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा