सात गझला_ गंगाधर मुटे 'अभय'



१.

गहाणात ७/१२.

गहाणात हा सातबारा वगैरे;
तरी वाढतो शेतसारा वगैरे.

जिथे ढेप-सरकी तिथे थांबते ही;
घरी खात नाहीच चारा वगैरे.

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला;
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?

अता अन्य काहीच पर्याय नाही;
करावाच लागेल ’मारा’ वगैरे.

बढाई असूदे तुझी तूजपाशी;
कुणी ना इथे ऐकणारा वगैरे.

कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला;
खरा तोच असतो पिणारा वगैरे.

कधी झोप मोडेल सुस्तावल्यांची?
किती वाजवावा नगारा वगैरे.

इथे पावलोपावली लाचखोरी;
कुणाचाच नाही दरारा वगैरे.

’अभय’ भोवती घे लपेटून धारा;
प्रवाहास नसतो किनारा वगैरे.



 २.

 दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे;
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे.

तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला;
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे.

तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला;
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे.

कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला;
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे.

अनासक्त मी! हे तिला मानवेना, कसे डाव लटकेच खेळायची ती;
वृथा आळ घेणे, मनस्ताप देणे, रुजूवात करणे वगैरे वगैरे.

कधी द्यायची ती दुटप्पी दुजोरा, मुळी थांग पत्ता मनाचा न येई;
मला पेच हा की पुढे काय होणे! मनाशी कचरणे वगैरे वगैरे.

मुसळधार होती तुझी प्रेमवर्षा, किती चिंबलो ते कळालेच नाही;
जणू थेंब प्रत्येक मकरंद धारा, मधाचे पखरणें वगैरे वगैरे.

तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे;
स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे.

"अभय" एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या;
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे.


३.

शब्दबेवडा

आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो;
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो.

हळवे अंतर खुणवत होते, "संपव जगणे" सांगत होते;
मग्रुरीच्या पोटासंगे दडून गेलो; जगून गेलो!

ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो;
सीतेला शोधणे विसरलो! लंकेमध्ये रमून गेलो!

अनुभूतीचा सुसाट वारू शब्दामधुनी उधळत गेलो;
व्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो.

आस्तिक मी की नास्तिक आहे, जेव्हा कोडे मला सुटेना;
परमार्थाशी नाळ जोडुनी मानवतेला भजून गेलो.

तुझे तडाखे सोसून काया झिजून गेली, सुकून गेली;
तरी निसर्गा! कुठे मनाने यत्किंचित मी खचून गेलो?

विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली;
पूजन-अर्चन, जंतर-मंतर तमाम तेव्हा करून गेलो.

देण्यासाठी घाव सुगंधी टपून होती फुले गुलाबी;
दुरून टा-टा करून त्यांना 'अभय' जरासा हसून गेलो.


४.

शेत लाचार झाले

आळस-तणाव-चिंता वाहून नेत आहे;
हृदयात चेतनेचा बघ पूर येत आहे.

पडताच वीज लखलख,थरकापता भयाने;
निर्जन शिवार मजला पदरात घेत आहे.

कायम गहाण सारे करण्यास सातबारा;
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे.

छाटून पंख आधी केलेय जायबंदी;
आता पुन्हा शुभेच्छा उडण्यास देत आहे.

अस्फ़ूट जाणिवेला मी शेंदले तरीही;
थोडी सचेत झाली, थोडी अचेत आहे.

नसतोस सोबतीला तू व्यूह भेदताना;
पुसतोस मग कशाला की काय बेत आहे?

दावा मला कुणीही कुठलाय एक मंत्री;
निर्मोह-त्याग-करुणा ज्याच्या कथेत आहे.

घे `अभय` दांडगाई सोसून लांडग्यांची;
झोपून वाघ असली जोवर गुहेत आहे.


५.

भांडार हुंदक्यांचे


ना दाविला जगाला बाजार आसवांनी;
एकांत मात्र केला बेजार आसवांनी.

धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी;
तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी.

संतप्त भावनांना हृदयात कोंबले पण;
केलाच पंचनामा दिलदार आसवांनी.

वंध्यत्व पावसाचे नडले पिकांस जेव्हा,
बरसून पाजली मग जलधार आसवांनी.

होतो पराभवांनी पुरता खचून गेलो;
पण रोवल्या उमेदी झुंजार आसवांनी.

जेव्हा विजयपताका पहिलीच रोवली मी;
जल्लोष धन्य केला साभार आसवांनी.

खस्ताच जीवनाचा पाया रचून गेल्या;
आयुष्य ठोस केले कलदार आसवांनी.

अश्रू कठोर-जिद्दी होताच निग्रहाने;
भिरकावली निराशा तडिपार आसवांनी.

बाबा तुझ्या स्मृतींचा केला पुन्हा उजाळा;
फोडून हुंदक्यांचे भांडार आसवांनी.

जे द्यायचे ते दे, जादा नकोच काही;
छळणे नकोच नशिबा हळुवार आसवांनी.

जा सांग 'अभय' त्याला की त्याग आत्मग्लानी;
बरसून दे म्हणावे अंगार आसवांनी.


६.

मरणे कठीण झाले

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले;
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले.

ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे;
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले.

हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले;
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले.

कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे;
पंचांग गावरानी पिकणे कठीण झाले.

बाभूळ,चिंच,आंबा;बागा भकास झाल्या;
मातीत ओल नाही,तगणे कठीण झाले.

सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला;
ओळख मलाच माझी पटणे कठीण झाले.

एकाच वादळाने उद्ध्वस्त पार केले;
आयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले.

दिसतात "अभय" येथे चकवे सभोवताली;
रस्ताच जीवनाचा सुचणे कठीण झाले.


७.

त्यांचाच जीव घे तू 

हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता;
म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता.

मातीत राबताना इतके कळून आले;
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!

पर्जन्य, पीकपाणी, दुष्काळ, कर्ज, देणी;
शांती महागडी अन केवळ तणाव सस्ता.

मरतोय अन्नदाता पर्वा न शासकांना;
करतात भाषणे ते आणून आव सस्ता.

लाठी उगारताना, बंदूक रोखताना;
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?

सत्याग्रहास आता रक्तात माखवावे;
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता.

शोधून शोषकांना तू लाव फास त्यांना;
त्यांचाच जीव घेणे उरला बचाव सस्ता.

शेतीत राबणार्‍या खंबीर हो 'अभय' तू;
एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता.


     < <<----Back to INDEX <<<----अनुक्रमणिका <<<----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा