सहा गझला_कलीम खान१.

ही तुझी वेदना दरवळू लागली;
प्रीत आता कुठे मज कळू लागली.

तू बरसला जिवाच्या दिव्यावर असा;
ज्योत पाण्यातही पाजळू लागली.

माझिया अंतरी हाय शिरताच तू;
वादळे या दिशेला वळू लागली.

आज शालीनतेची मुकी पाखरे-
झाड सोडून माझे पळू लागली.

ह्या नव्या चक्रवातात आता जुनी;
उंच शिखरे सहज कोसळू लागली.

स्थीर मातीत होती मनाच्या उभी;
तीच तत्वे अता डळमळू लागली.

धुंद ,स्वच्छंद ,निर्बंध जगण्यास ह्या;
रेशमी बंधने आवळू लागली.

काय झाले असे केशराची फुले;
वाळवंटात ही आढळू लागली.

हा ऋतू कोणता मनधरा तापली ,
चिंब ओली निराशा जळू लागली.

बंद करताच मी नयनदारे सख्या;,
आसवे पापण्यांना छळू लागली.

ही प्रतीक्षा तुझी प्राण-जात्यावरी ,
आर्द्र दाणे क्षणांचे दळू लागली.

शब्द गेले कुठे काय झाले मला;
आज माझी जिव्हा,अडखळू लागली.

चंद्र येता मिठीच्या नभी हासरा;
लाजरी सांज हलके ढळू लागली.


२.

हवा कशाला आरसा ?
तुला दिसे जग,तू तसा !

जगात सूर्ये वाटतो;
घरात नाही कवडसा.

महान होण्याची तुला-
कुठून सुचली अवदसा.

अजून माणुस व्हायचा-
विचार नाही फारसा.

भिकार स्वप्ने पाहशी;
कशास माझ्या राजसा.

कधी न वस्त्रे लाभती;
तुलाच कां रे कापसा.

असून नसण्याचा सदा;
मला मिळाला वारसा.

मुळात दु:खाच्या तुझ्या;
तुझी सुखाची लालसा.

कुणी न पैसा तुज दिला;
तरीहि ये रे पावसा.

तुला हवे जर नाव तर;
'कलीम' त्यागी तू कसा.

३.

भाबडा शंकर 

नाही मायाळू सासर;
कडू लागते साखर.

दीस पावसाचे आले;
नदी काठी माझे घर.

जीव पारा-पारा झाला.
तुझ्या ओंजळीत धर! 

आकाशाच्या कातळाला;
कधी फुटेल पाझर?

त्यानं समुद्र ओतला;
माझी रिकामी घागर.

सात पिढ्या पाटीलकी;
औंदा पडीत वावर.

विष माझ्याच वाट्याला;
मीच भाबडा शंकर.

४.

सूर मागाया तुझे जीव झाला बासरी;
परतुनी आली पुन्हा तान माझी बावरी.

शांत कुठल्या सागरी,दूर तू,अतिदूर तू ;
मी इथे हेलावतो वादळी लाटेवरी.

स्पंदने दारावरी थाप जेंव्हा मारती;
नेमका तेंव्हाच मी हाय रे नसतो घरी.

मी कुणा दावू अता वांझ एकाकी व्यथा;
लाजरी माझी जिव्हा, आसवे ही लाजरी.

झोपली सारी घरे;पेंगले प्रासाद ही;
जागते अजुनी तरी,एक पागल पायरी.


५.

दूर - दूर त्या रानामध्ये सूर्य झोपला सरणावरती;
हळुच थांबली संध्या तेथे जाता-जाता वळणावरती.

अनुरागाची लाज राखण्या,सर्वस्वाचे अर्घ्य दिले अन
मान टाकली सूर्य-फुलाने गहिवरलेल्या पर्णावरती.

पालीच्या चालीने आता जनावरे ही काळोखाची;
बघा निघाली चरण्यासाठी,नीलनभाच्या कुरणावरती.

ओसरल्यावर तेज रवीचे भरती आली आठवणींना;
डोळ्यांमधले पाणी पागल आणि सांडले चरणावरती.

दळून अपुले अवघे जीवन उरलेले क्षण जगण्यासाठी;
कुणी बापुडा कवी इथे हा रचतो ओव्या मरणावरती.


६.

अल्पसे हे दु:ख याचा फार बोभाटा नको;
पण भिती वाटेल इतका दीर्घ सन्नाटा नको.

वेदना दे,वंचना दे,दे तुझी दु:खे मला;
हे सुखांचे पीक मजला,यामध्ये वाटा नको.

ठेवतो सांगून तुजला ऐक मंबाजी जरा;
आज वाटेवर तुक्याच्या,एक ही काटा नको.

मी नको म्हटले तरी तू वेळ माझा घेतला;
मोजके आयुष्य असता,हा असा घाटा नको.

देत मी नेहमीच आलो घेतले तू ही जरी;
कर्ज माझ्यावर तुझे,हा न्याय उफराटा नको.

रुतुन कायमचेच बसतिल पाय नजरेचे जिथे;
त्या तुझ्या डोळ्यांत ऐसा रेशमी गाटा नको.

मी यशाच्या,अपयशाच्या,पार गेलो रे पुढे;
जीवनाच्या सांजवेळी,ज्वार अन भाटा नको.

वादळांनो शांत व्हारे,काळ आहे झोपला;
झोप गे मुंगे,परंतू,उंच खर्राटा नको.


     < <<----Back to INDEX <<<----अनुक्रमणिका <<<----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा