चार गझला_ संदीप पाटील

सावली वाटून आला अन उन्हातच राहिला;
प्रश्न माझा का असा माझ्या मनातच राहिला.

रूप चंद्राचे दिल्यावर पौर्णिमा आलीच नाही;
सूर्य बुडला, थांग सारा शोधण्यातच राहिला.

ओठ घेताना तिने ही गाल देणे टाळले;
त्याच वेळी हा मुका माझ्या मुखातच राहिला. 

परतण्याची वाट त्याला भेटली नाही कधी;
दु:ख गेले लांब कारण तो सुखातच राहिला.

जेवढे सांगायचे होते तिला...ती बोलली;
हुंदका दाबून डोळा आसवातच राहिला.

राहण्यासाठी दिला बघ काळजाचा कोपरा;
त्या कवीचा चेहरा ह्या आरश्यातच राहिला.

पाप पुण्याचा हिशेबच शेवटी केला असा;
ती हवेची राख झाली , "तो धुक्यातच राहिला"! 


२.

तसे कर्ज काढू घरावर किती;
तुझ्या नोकरीच्या बळावर किती.

पगारात भागत नसावे तुझे;
उधारीत आणू गं साखर किती.

दिला एक सल्ला कि उपवास कर;
चणे-शेंगदाण्यात ढेकर किती.

तुला भेट व्हावी असे वाटते;
तुही कापले सांग अंतर किती.

मला एक उत्तर हवे आजही;
नदीने भरावेत सागर किती?

तुही चालला ह्या प्रवासात पण
तुला वाटली वाट खडतर किती.माझ्या जखमेवरती आई तुझीच फुंकर होते;
उन्हाच्या कठोर झळांना बाबांचे छप्पर होते.

कुठले कुठले ओझे माझ्या अंगावरती घेवू मी;
एक उधारी फिटली पण कर्जाचे डोंगर होते.

मारामारी झाली तेव्हा घरात लपले सारे;
पोलीसांच्या प्रश्नासाठी माझे उत्तर होते.

गस्त घालण्याआधी त्यांनी फार चौकशी केली;
बाजाराचे बाग बगीचे इतके सुंदर होते.

चोरीच्या सामानाला ह्या नाही कोणी वाली;
माझ्या आधी तेही कुठल्याश्या रस्त्यावर होते.

ज्या मेंढ्या रस्ता चुकल्या काळोखाच्या रानातुन;
फार उशीरा कळले त्यांना, मागे धनगर होते.

आभाळाला हातच त्याचा थोडा लागत होता;
छोट्याश्या अभिमानाला गर्वाचे डोंगर होते.

४.

कुणीच नाही या रस्त्यावर बोलू आपण;
उजेडात ये काळोखावर बोलू आपण.

पेन भुकेला शब्दांचा अन उपासमारी;
थोडी कविता थोडे गझलांवर बोलू आपण.

घेणे देणे बाकी आहे या जगण्याचे;
मरण्यापूर्वी आयुष्यावर बोलू आपण.

तुझी वेदना अर्थ मनाचा सांगत नाही;
शक्ती आहे पण कर्मावर बोलू आपण.

कधी बोललो नाही आपण ज्या प्रश्नावर;
पर्वा नाही त्या प्रश्नांवर बोलू आपण.

आई सोबत रडलो आपण हसलो आपण;
राहुन गेलेल्या बापावर बोलू आपण.

उगाच नियती नाही या वाटेने आली;
रस्ता चुकलेल्या हातावर बोलू आपण.

तुझी बातमी कळली तेव्हा हळहळलो मी;
जीव म्हणाला चल श्वासांवर बोलू आपण.


     < <<----Back to INDEX <<<----अनुक्रमणिका <<<----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा