चार गझला_बदीऊज्जमा बिराजदार (साबिर शोलापुरी)


१.

जरी तापला

जरी तापला,शेवटी यार आहे;
किती गोड त्याचा पहा वार आहे.

पराजय कुणालाच चुकणार नाही; 
पचव तो, विजय दूर का फार आहे? 

किती लाघवी रीत नाकारण्याची; 
नकारातही आज होकार आहे.

कशी वाटते आज बेरंग मेंदी? 
विधीचा कसा आज शृंगार आहे.

करू काय? हे ओठ...हे दात माझे; 
विरोधात माझेच सरकार आहे. 

कसे त्यास गझलेत आणू कळेना; 
खुदाचा निराकार आकार आहे.

उगवणार जे पेरले तेच अंती; 
तुझ्या जिंदगीचेच हे सार आहे.

नजरबंद करतेस झटक्यात एका; 
मदारी तुझी ही नजर फार आहे. 

घडा पालथा काय भरणार 'साबिर'? 
खटाटोप साराच बेकार आहे!



२.


दुनियेस त्या जिवाची

जो पेटला जगास्तव त्याला जरा जळू द्या;
दुनियेस त्या जिवाची कळकळ तरी कळू द्या. 

गझलेस राजरस्ता तो दाखवून गेला;
या आजच्या कवींचा तांडा तिथे वळू द्या.

शिशिरातही बिचारे ते फडफडीत बसले;
ते पान फार पिकले, त्याला सुखे गळू द्या.

झाला प्रचंड बभ्रा त्याच्या प्रतारणेचा;
कोर्टामधे नको ती चर्चा तरी टळू द्या.

अद्याप लोक काही मोताद भाकरीला;
साबिर म्हणे अशांची गरिबी तरी पळू द्या.

३.


झाली संध्याकाळ
.
आकाशाला पांघरतांना झाली संध्याकाळ मंडळी!
धो-धो वर्षा कोसळताना झाली संध्याकाळ मंडळी!

उल्का झाली धावत आली तारकास हे नंतर कळले;
मनी मुक्याने मुसमुसताना झाली संध्याकाळ मंडळी!

परिस्थितीच्या जात्यामध्ये भरडत होतो मी जखमांना;
आक्रोशाने घुटमळताना झाली संध्याकाळ मंडळी!

असे कोणते ठिकाण आहे दुःख वेदना नसेच जेथे;
तिथून त्यांना पांगवतांना झाली संध्याकाळ मंडळी!

सरस्वतीच्या सागरात मी शंख शिंपले वेचत होतो;
अथांग सागर खळबळताना झाली संध्याकाळ मंडळी!

स्वप्नामधल्या रंगमहाली सौभाग्याचे हिरवे लेणे;
आनंदाने रिमझिमताना झाली संध्याकाळ मंडळी!

सूर्याच्या अन चंद्राभवती जळत राहिलो मेणाजैसा;
मेण सुतासह मिणमिणतांना झाली संध्याकाळ मंडळी!

कळ्या फुलांची बाग बहरली मला नेमके कळले तेव्हा;
सुगंध त्यांचा दरवळताना झाली संध्याकाळ मंडळी!

फुशारकीचे कालिदास ते रत्नपारखी स्वतः समजती; 
मनेच त्यांची जळजळताना झाली संध्याकाळ मंडळी!

नकोच 'साबिर' हेवेदावे करू नका हो कृत्य अघोरी;
नैराश्याने तळमळताना झाली संध्याकाळ मंडळी!

४.


कळेना अशी कोणती

कळेना अशी कोणती चूक झाली?
जिची आज शिक्षा मला ही मिळाली!

दिशा आज त्याच्याच गातात गझला;
टवाळी किती काल त्याचीच झाली!

जगातून तो चालता जाहला अन्;
जगाला खरी आज किंमत कळाली.

मला तार वा मार मर्जीप्रमाणे;
उभा जन्म केला तुझ्या मी हवाली.

किती स्वप्न होते गुलाबी गुलाबी;
कळाले न केव्हा मला जाग आली!

अहोरात्र मी पूजले हाय ज्यांना;
अशी माणसे घातकी का निघाली?

किती लोक हे फोडती आज टाहो;
तुझा अंत साबिर असावा अकाली!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा