१.
सोडुनी अंधार
सोडुनी अंधार सहसा जात नाही;
काजळीवरती दिव्याची मात नाही.
जोडल्या हातात किरणांनी शिरावे;
सूर्य म्हणतो तेवढी औकात नाही.
वादळी वाटेत पणत्यांनो शहाण्या;
काजव्यांना तेल नाही,वात नाही.
आडवाटेला गवसले दुःख तान्हे;
भाग्य त्याचे धर्म नाही,जात नाही.
यायचे ते मरण येणारच परंतू
तीर्थयात्रेसारखा अपघात नाही.
जोतिशाच्या पोपटाला हे विचारा;
रान हिरवे का तुझ्या नशिबात नाही?
जीव खुडलेल्या फ़ुलांचा हार घालून;
हे अहिंसे तू तुझ्या तत्वात नाही.
२.
सवलत
मी पुढे जाऊ नये त्यांच्या गतीने;
केवढे उपकार केले सवलतीने.
नजरवेगाने कुठे यश दूर गेले;
शोधतो मी कासवाच्या सोबतीने.
सवलती केल्यात सोन्याच्याच कुबड्या;
चपळ वै-यांच्या सनातन शर्यतीने.
कोण घडतो शांत हौदावर खलाशी?
चेव यावा भोव-याच्या दहशतीने.
अस्मितेचा सूर्य म्हणतो वंश माझा-
वागतो फ़ुटक्या दिव्यांच्या हरकतीने.
स्वाभिमानी गरूडपंखांनी कशाला,
झेप घ्यावी कोंबड्याच्या ऎपतीने?
रीत ही बागेत काटे सोसल्यावर;
मानते किर्ती गुलाबाच्या वतीने.
झाड पिकल्यापासुनी आरक्षणाचे;
ठेवले कच्चे मला बागायतीने.
३.
कशाला पाहिजे
कोरडा आहे किनारा तळ कशाला पाहिजे?
उथळ पाण्याला त्सुनामी कळ कशाला पाहिजे?
धीर खचलेल्या क्षणांवर संकटांची रास ही;
आणखी राशीमधे मंगळ कशाला पाहिजे?
स्वप्नहिरवी प्रश्नचिन्हे अणि उत्तर एक तू;
मग तुझ्याहुन वेगळी हिरवळ कशाला पाहिजे?
मिसळते हळदीत जी कावीळ हुंड्याची अशुभ;
एवढे रोगट सुखाचे स्थळ कशाला पाहिजे?
मारला मी दगड;झाडाने मला आंबा दिला
एवढी माती तरी प्रेमळ कशाला पाहिजे?
दूध त्यांनी विकत नाही घेतले पाण्यामुळे;
एवढी भेसळ तुझी निर्मळ कशाला पाहिजे?
मोकळे अश्रू करावे हा तुलाही हक्क ना?
मग रुमालाचीच तारंबळ कशाला पाहिजे?
पडुन श्रीफ़ळ नारळीखाली पुजारी वारला;
तोच विक्रीला पुन्हा नारळ कशाला पाहिजे?
दार सादळले मिटेना कोण बेघर पावसा;
लाकडाला एवढी तळमळ कशाला पाहिजे?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा