तीन गझला_निशब्द देव



१.

तुझी आठवण भोवताली असावी;
किती वेदना भाग्यशाली असावी.

असा वासनाग्रस्त तू स्पर्श केला;
किती लाज अर्थास आली असावी. 

चितेवर कसा शेठ रडतोय त्याच्या;
कदाचित उधारी बुडाली असावी.

पुन्हा आठवण प्यायला बैसली,बघ; 
कुठे दूर उचकी निघाली असावी.

मला माहिती मी गझलकार नाही; 
कशी काय अफवा, उडाली असावी.

२.


याच गोष्टीचा मला आधार होतो;
तू दिलेला घाव सल्लागार होतो.

एवढे मजबूत चल नात्यास बनवू;
चंद्र हो तू,मी तुझा अंधार होतो.

एवढे तर जाणतो मी,वेळ येता;
बाप आईच्या दुधाची धार होतो.

गाडले शेतात का माझे कलेवर;
काय तेथे मी पुन्हा उगणार होतो?

ना कधी येऊ दिले ओठावरी मज;
मी तिच्यासाठी तिचा होकार होतो.


३. 

एवढ्या साधेपणाने बोलते हो;
प्राण हा जाईल माझा,वाटते हो. 

न्यायधीशा सारखा पाऊस हा,अन 
शेत फासा सारखे का वागते हो?

पाहतो फोटोत आईला जसे मी;
हातची हातात भाकर राहते हो.

ज्या सफाईने कळीचे फूल होते;
त्या सफाईने मला ती टाळते हो.

एवढे सांभाळले मज वेदनेने;
की तिला आई म्हणावे वाटते हो.

वाटले आली तशी जाईल देवा;
भूक कोठे पाठ माझी सोडते हो.

येत जाते दाद जेंव्हा वेदनांची; 
छान लिहितो मी असे मज वाटते हो.

     < <<----Back to INDEX <<<----अनुक्रमणिका <<<----

1 टिप्पणी: