पाच गझला_ममता



१.

राहिले आता न काही द्यायचे;
भाळल्यावर काय सांभाळायचे?

ठेच ही लागो न पायाला तुझ्या;
मी भले रस्तेच गोंजारायचे.

फ़क्त एका उत्तरासाठी तुझ्या;
मी कितीदा प्रश्न हे बदलायचे?

काय तू शोधायचा डोळ्यात या;
मी तुझ्या नजरेत का वितळायचे?

पावसाची नेहमी होते पुजा..
ऊन कोणी सांग ओवाळायचे?

वादळी वारे म्हणू की मौसमी?
जे तुझ्या माझ्या दिशेने यायचे!

जर तुलाही लागले चंद्रा ग्रहण; 
मी कुणाला चांदणे मागायचे?

वाढल्यावर सांग श्रीमंती तुझी; 
मी किती कंगाल आहे व्हायचे?


२.

दुनिया उगाच का रे ही संभ्रमात आहे;
काही असेल तर ते माझ्या तुझ्यात आहे.

चिडल्यावरी तसाही कडवट,तिखट,तूरट तू;
पण गोडवा तुझा त्या समजावण्यात आहे.

का आजही मनाला निश्चिंतता मिळेना;
कुठला अजून धोका त्या भरवश्यात आहे.

माझी हरेक वस्तू माझ्या घरी परंतू
काळीज ठेवले मी त्याच्या खिशात आहे!

आहे तसा व्यथेशी व्यवहार काळजाचा.
सगळा हिशोब त्याचा या पापण्यात आहे.

माझ्या तुझ्यातले मग अंतर मला म्हणाले-
आहे तुझ्या मनी जे..त्या अंतरात आहे!

तोडू नकोस धागा,सोडू नकोस गाठी;
वेड्या तुझ्याचसाठी मी बंधनात आहे.

३.

उन्हावर नको;पावसावर नको;
कुणाचेच ओझे कुणावर नको.

तुला गिरवल्यावर कळेना मला;
तुझ्यावर लिहू की तुझ्यावर नको.

नवी धार सांगे बळी दे नवा;
जुने डाग आता सुर्‍यावर नको!

झुलावे असे जर कधी वाटले;
मिठी दे तुझी त्या झुल्यावर नको.

पुन्हा बोलली कोवळी पालवी;
पुन्हा घाव आता मुळावर नको.

म्हणे उंबरा काल माझा मला;
तुझी सावली या घरावर नको.

जरा गाल दे,ओठ दे ना जरा;
खुळ्या मागण्या ह्या;खुल्यावर नको!


४.

जर ठरले आहे तर ते घडणारच;
तू ढासळताना मी कोसळणारच.

अंदाज ढगांचा जर ठाम निघाला;
भर ऊन असू दे पाउस पडणारच.

शेवट झाल्यावर सुरूवात कशाला?
या सुरूवातीला शेवट असणारच.

दोघात असू दे मग लाख दुरावा;
कक्षेत सुखाच्या दु:खे फिरणारच.

मुक्काम कुठे हे जर माहित आहे;
तर त्याच दिशेने पाउल वळणारच.

इतके साधेही का कळले नाही;
धागा तुटला की गाठी सुटणारच.

भर दिवसाढवळ्या जर घडल्या भेटी;
रात्री अपरात्री त्या आठवणारच.

अर्ध्या उचकीला जर तो आठवतो..
त्यालाही तेव्हा ठसका बसणारच!

मी बंद करू का दरवाजा खिडक्या;
तू आल्यानंतर घर दरवळणारच.


५.


शाब्दीक नाही मागणे लिहिले असे अर्जातही;
मृत्यू अटळ देवा जिथे सवलत मिळो जगण्यातही!

समजू शहाणा की करू वेड्यात मी त्याला जमा;
करतो जिथे शेवट तिथे करतो नवी सुरूवातही.

माझ्याविना तो पूर्ण हे भेटेल त्याला सांगतो; 
त्याच्या अपूर्णत्वास मी जपले किती माझ्यातही.

तू भेटल्यावर काय होते काय सांगू नेमके; 
बर्फात लपते आग;देते गारवा वणव्यातही.

शोधू नका मौनात माझ्या नाव त्याचे नेमके;
तो बंद या ओठात आहे कैद या डोळ्यातही!

सारे उन्हाळे पावसाळे बांधले शब्दात तू;
मग भेटले सारे ऋतू नुसते तुला बघण्यातही!

नाहीस की आहेस तू चर्चा नको आतातरी;
आहेस जर तर सिद्ध कर आहेस त्या दगडातही!



1 टिप्पणी: