पाच गझला_मनिषा नाईक१.

शहरभर अंधार तर पसरून जातो;
सूर्यही घर नेमके चुकवून जातो.

मी करावा सामना त्या श्वापदाचा;
हा शिकारी बेत डोक्यातून जातो.

देखण्या असतात काही वेदनाही;
हुंदका माझा मला सांगून जातो.

मी तुला भेटायचेही टाळते पण
तू विचारासारखा येऊन जातो.

ये मनाला शांत कर माझ्या सख्या तू;
दूर पाहू कोण मग येथून जातो.

एक वारा, एक वादळ, एक नाते;
मांडलेला डावही मोडून जातो.

मी कधीचे सोडले घर यातनेचे;
एक अश्रू हाक का मारून जातो.

बंद केले मी स्वतःला आत माझ्या;
दार माझे कोण ठोठावून जातो.

२.

दिसेल का नभात चांदणे अजूनही;
जमेल का तसेच जागणे अजूनही.

चिडून मी म्हणेन, "घर उन्हात बांधते";
कधीतरी हवीत, भांडणे अजूनही.

शहारते बघून आरसा पुन्हा पुन्हा;
खुणावते दुरून पाहणे अजूनही.

कधी? कुठे? कसे? सवाल वाढले किती;
कशास तुज हवीत कारणे अजूनही.

पहायचे पुन्हा बहर नवे,कहर नवे;
जमेल का मिठीत लाजणे अजूनही.

वळून मी करेन गृहप्रवेश एकदा;
तुझ्या घरास बांध तोरणे अजूनही.

मिटून लोचनास रात्र जागवू पुन्हा;
घडेल का लपून भेटणे अजूनही.

नकोत बंधने अशी सहायचे किती;
पहा जमेल धीट वागणे अजूनही.

३.

खोट हवी थोडीशी इतके तंतोतंत नको;
शिखरावर जावून लगेच यशाचा अंत नको.

घेणार किती सत्व परीक्षा इतके भोग दिले;
दगडा इतका आज कठीण मला भगवंत नको.

जन्मासोबत असलेले चुकले ना भाग्य कधी;
जगताना दुर्भाग्य अता कुठलीही खंत नको.

जाण्यासाठी येतो बहराला हुरहुर देतो;
ग्रीष्माचा दाह बरा सोड मुजोर वसंत नको.

चुकले जर मार्ग कधी रस्ता मज सांगेल खरा;
सज्जन एक असावा लाखो फसवे संत नको.

घडल्या ज्या लाख चुका सगळ्यांची यादी कर तू;
प्रश्न जुने सोडवते कुठला विषय ज्वलंत नको.

४.

मला आज सारे नव्याने मिळावे;
तुझ्या सोबतीच्या रुपाने मिळावे.

नको बंधने अन् नको बांध घालू;
खुले वागण्याचे बहाणे मिळावे.

कुबेरापरी गर्भ श्रीमंत व्हावे;
भले दु:खही वारशाने मिळावे.

नको ती उधारी करू बंद खाते;
हवे ते हव्या त्या दराने मिळावे.

कुठे जन्म घ्यावा;कुठे अंत व्हावा;
धडे जीवनाचे क्रमाने मिळावे.

किती एकटे एकटे मी जगावे?
मला प्रेमही घोळक्याने मिळावे.

तिने नेहमी वाट शोधीत यावे;
नदीला कधी सागराने मिळावे.

करारातले वायदे तोडले तू;
दिलासे तरी कायद्याने मिळावे.


५.

गर्दीत तुला शोधत असते;
नजर शहरभर धावत असते.

भेटी, गाठी, रुसवे, फुगवे;
बेत असेही आखत असते.

स्वप्नात तरी तू भेटावा;
या आशेवर जागत असते.

होईल गडे भेट अचानक;
रोज मनाला सांगत असते.

असते जर भाषा नजरेला;
शब्द कशाला जुळवत असते.

जळल्यावर विझणे आले;
ज्योत तरीही पेटत असते.

थोडे सरले, थोडे बाकी;
दिवस असे मी मोजत असते.

वाट पहाणे जमणार कसे?
वेळ कशाला वाढत असते.

वेशीवर तू येण्याआधी;
रोज मनाला धाडत असते.

रंगत जातो क्षण एखादा;
क्षणभर जग मी विसरत असते.

नाव तुझे मी घेण्याआधी;
का एकांती लाजत असते.

सहज जिथे मग जुळते नाते;
चार प्रहर रेंगाळत असते.

येशील तसा जाशील पुन्हा;
दोन घडीची सोबत असते.


     < <<----Back to INDEX <<<----अनुक्रमणिका <<<----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा