चार गझला_श्रीराम गिरी


१.

रात सारी तो भयाने जागतो नुसता;
कल्पनेने जीव त्याचा कापतो नुसता.

काय त्याला पाहिजे ना जाणतो तोही;
सोडुनी या उंबर्‍याला धावतो नुसता.

सांगतो ना तो कधीही दु:ख कोणाला;
पाहुनी दुनियेस कायम हासतो नुसता.

काय नंतर त्या फुलाची काळजी कोणा
भृंग येथे गंध त्याचा चाखतो नुसता.

ना दिसे कुठली समस्या दूर होताना;
देश अपुला बातम्यांनी गाजतो नुसता.

काम करते राहिलेले ही हवा पुढचे-
एक ठिणगी तो इथे रे टाकतो नुसता.

२.
बोलुया हिंसक-अहिंसक भावनांवर;
या करू चर्चा जरा या जीवनावर.

नेमकी सुचते तुला कविता कशी ही-
प्रेम जर नाही तुझे ह्या माणसांवर.

मी कधी संतुष्ट झालो बोलण्याने;
लक्ष माझे या जगाच्या वागण्यावर.

तीच तर करती तुलाही स्वच्छ-सुंदर;
तू नको रागे भरू या संकटांवर.

सांगुनीही हे तुला कळणार नाही;
काढले आयुष्य कैसे आठवांवर.

३.

गाणे असे सुखाचे दिनरात ऐकतो मी;
हसण्यात हुंदक्यांचे पडसाद ऐकतो मी.

मज वावडे जराही नाही गडे धुळीचे;
येथे कमळ उगवते चिखलात ऐकतो मी.

पर्याय राहिला ना खोट्याशिवाय येथे;
नेकी लपून बसली विवरात ऐकतो मी.

हृदयात आपल्या जर ही न्याय आणि समता;
का नित्य माणसाचा छळवाद ऐकतो मी.

शोधात जन्म गेला ज्या गीत-उत्सवाच्या;
ते सप्तसूर आता गगनात ऐकतो मी.

पाठीत खोल दिसतो एकेक घाव त्याच्या;
झाला इथे परंतू अपघात ऐकतो मी.

अग्नी दिलास तेव्हा नात्यास तूच अपुल्या;
हाका कशास आता विजनात ऐकतो मी.

४.

कुणा काय मागू,कुणा काय देऊ?
कळेना मला हा कुठे जीव लावू?

मला भेव ह्या वाटते माणसांचे;
कुठे पाय ठेवू,कुठे मी विसावू?

पहा शब्दही लागले सूर मागू;
मला सांग तू कोणते गीत गाऊ?

तुझ्या हासण्याने उभा श्वास माझा;
कसा सोडुनी मी तुला सांग जाऊ?

किती झापडा ह्या तुझ्या लोचनांवर;
कशाला तुला आरसा सांग दावू?


     < <<----Back to INDEX <<<----अनुक्रमणिका <<<----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा