चार गझला_स्वामीजी

                                                       




१.

आरशातले दिसले होते

श्रावणातल्या पावसात मन भिजले होते;
आठवणींच्या सरीसवे भरकटले होते.

काटे माजुन कुंपणावरी तिरस्कारले;
निवडुंगावर गुच्छ फुलांचे फुलले होते.

अंजीराच्या बरोबरीने उंबर फळला;
आत चिमुकली बजबज, सारे किडले होते.

मोठेपण मिरविण्यास हत्ती पाळू ठरले;
उभा कराया जागेवाचुन नडले होते.

गझल ऐकवत मुशायऱ्यावर छाप पडू द्या;
टाळ्या द्या घ्या, रहस्य यातच दडले होते.

कसा असे मी, ओळखण्याचा प्रयत्न केला;
प्रतिबिम्बच मज आरशातले दिसले होते.



२.

अजून जाऊ परतुन तेथे

आपण काय म्हणूनी जगलो, जगणे जर लोकांचे होते;
अपुल्यावरती अपुल्यापेक्षा हक्क खूपसे त्यांचे होते.

जुई मोगरा फुलत राहिले कुठे कुंपणावरती टांगुन;
दिवाणखान्यामधे ताटवे सजले निवडुंगांचे होते.

जाब नसे, फिर्याद नसे ही, चुकुन कधीही प्रश्न न केला;
म्हणण्यापुरते राजाराणी, गुलाम का भलत्यांचे होते?

तुझे नि माझे नव्हते काही तुझे नि माझे म्हणुन मोजण्या;
विसरुन गेलो वाटप करणे, सगळे जे दोघांचे होते.

मनाभोवती भिंती नव्हत्या, नजरेवरती पडदे नव्हते;
स्मरते का तुज डोईवर छत चमचमत्या तार्‍यांचे होते?

संगमरवरी इमला बांधत हृदय कसे दगडाचे झाले;
अजून जाऊ परतुन तेथे, घरटे गवत-पिसांचे होते.



३.

हा जगाचा खेळ न्यारा

हा जगाचा खेळ न्यारा दुर्बळाला शापतो;
देव तो न्यायासनाचा नेत्र अपुले झाकतो.

खेळ फसवा सावलीचा, जी हवी डोक्यावरी;
पाय धरते तीच माझे, सूर्य जितका तापतो.

वाकुनी ना नम्र कोणी, फार धोका यामधे;
तीर तितका वेग घेई, धनुष जितका वाकतो.

ऐकुनी घेतात खोटे, हा शिरस्ता येथला;
सत्य सांगावे कुणाला, तो पुरावे मागतो.

जप्त हा जामीन होतो, कर्ज घेणारा सुटे;
मुद्दलाच्या वाटपाला कायदाही जागतो.

सावली माझी म्हणू का ? की तिची आशा नको?
घुप्प अंधारात नसते, एकटा मी चालतो.

४.

जगण्यास माणसाच्या

जगण्यास माणसाच्या अभिशप्त धार आहे;
चंदी पुढ्यात दिसता मागून आर आहे.

कवितेत चांदणे अन्‌ कोमल पहाट सांगा;
प्रत्यक्ष ग्रीष्म येथे, जळती दुपार आहे.

म्हणतात कर्म करता नक्की फळे मिळावी;
राबून घास पोटी हाही जुगार आहे.

जुजबी दिखावटीने जगणार भावना का?
सांगून प्रेम करणे झाला पगार आहे.

हळुवार फुंकरीचा जखमेवरी दिलासा;
चोळावयास त्यांच्या हातात खार आहे.

जगणे मिळे सुखाचे परि ते उगाच म्हणती;
डोईवरी जगाची चिन्ता नि भार आहे.


     < <<----Back to INDEX <<<----अनुक्रमणिका <<<----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा