दोन गझला_राधा भावे


१.

गुन्हा केलाय काट्यांनी, फुलांवर बेतले आहे;
बिचार्‍या सावलीलाही उन्हाने झाकले आहे.

असा का हातघाईला पुन्हा येतोस शब्दा तू;
पहा मौनातही माझ्या खुलेपण साठले आहे.

किती औदार्य प्रश्नांचे कधी मज टाळले नाही;
घराणे उत्तरांचेही रितीने वागले आहे.

कधी येऊन जा सूर्या अचानक मध्यरात्री तू;
इथे अंधार लाटांचे खवळणे वाढले आहे.

खुडावा देठ पानांचा तसा हा श्वास थांबावा;
जिण्याचे सोंग आताशा उगाचच चालले आहे.

२.

मी बेसावध असताना येऊन धडकले वादळ;
अन समजावून थकल्यावर हलकेच सरकले वादळ.

जा सोड मनाची जागा,मी म्हटले; ते ओसरले;
पण नाव तुझे दिसल्यावर भलतेच भडकले वादळ.

जर फसव्या होत्या हाका,हृदयात उमाळे नव्हते;
कोणाच्या शब्दांवरती हे सांग थिरकले वादळ.

फितवून ऋतूंना सार्‍या मज भुरळ घातली त्याने;
काळीज वितळण्या आधी पण मीच झटकले वादळ.

या आयुष्याच्या पदरी त्यालाही बांधू म्हटले;
माझ्यात फुलांचा तांडा पाहून दचकले वादळ.

हळवे नि गुलाबी झाले अन आवेगाने आले;
मी फक्त म्हणाले ‘नाही’,तेथेच थबकले वादळ.

चल उधळू,सांडू,तोडू हा होता त्याचा हेका;
गहिवरली फुंकर माझी,तेथेच अडकले वादळ.



     < <<----Back to INDEX <<<----अनुक्रमणिका <<<----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा