पाच गझला_वंदना पाटील



१.

दारी उगाच आले सारे हसावयाला;
आले कुणी न माझे डोळे पुसावयाला.

समजून देव त्यांना मी दूध पाजले पण
ते काढती फणा का मजला डसावयाला.

झाला लिलाव जेव्हा माझ्या गडे व्यथांचा,
तू पाहिजेच होते तेथे असावयाला.

मी मैफलीत त्यांच्या गेलो कधी जरासा;
जागा कुठेच नव्हती मजला बसावयाला.

मजला दिले सुळी पण काही न त्रास झाला;
गळफास तू दिलेला होता कसावयाला.

२.

गीत हे येईल कैसे बंद ह्या ओठातुनी;
कोंडलेले श्वास काही राहिलेले आतुनी.

आजही दु:खासवे मी राबता राहू दिला;
ही जरी ओसंडली सारे सुखे दारातुनी.

सांत्वनाला तू कुठे होतीस माझ्या भोवती;
पूर अश्रूंचा उगा वाहू दिला डोळ्यातुनी.

कालचा पाऊस माझ्या अंगणी आला कुठे?
शिंपली मी बाग माझी माझिया घामातुनी.

सांग मी फिर्याद आता घेउनी जाऊ कुठे?
सांडले आयुष्य हे पार्‍यापरी हातातुनी.

३.

प्राशुनी अंधार मी सूर्यापरी तेजाळतो;
वेदनांसाठी नव्या जखमा जुन्या कवटाळतो.

काळजाला बनवले मी आज वज्रासारखे;
रोजच्या ह्या वादळांना मी कुठे कंटाळतो!

वेग वार्‍याचा तुझा;तू शोध वाटा वेगळ्या;
मी असा हा पांगळा बघ सारखा ठेचाळतो.

लाभुदे तुजला फुलांचे ताटवे पायातळी;
मी इथे हृदयातले काटे सुखे सांभाळतो.

या तमातुन शोधतो वाटा उजेडाच्या पुन्हा;
मी कशाला भोवतीचे चांदणे कुरवाळतो.

४.

मी बोलतो कधीचा मौनात एकट्याशी;
पटले कधी न माझे बाहेरच्या जगाशी.

मजला जरी खुणवले त्या दूरच्या दिव्यांनी;
घेऊन झोपतो मी अंधार हा उशाशी.

वाटे दुभंग झाले काळीज हाय माझे;
आवाज हा जरासा मी ऐकला मघाशी.

मी देव शोधण्याला जाऊ कुठे कशाला?
माझ्या मनात वसते आहे प्रयाग-काशी.

ही ओढ पावलांना लागे अता कशाची;
ना थांबलो कुठेही मी आगळा प्रवासी. 

५.

चंद्र आहे, रात्र आहे,मंद आहे चांदणे;
भेटण्या येशील का तोडून सारी बंधने.

धुंद वारा गीत गातो हे तुझ्यासाठी पुन्हा;
अन तुला देतात हाका काळजाची स्पंदने.

तू म्हणाली तारका केसामध्ये माळायच्या;
काय हे भलत्याच वेळी हाय भलते मागणे!

हा ढगांच्या आडुनी लागे निघाया चंद्रमा;
अन तुझे ते ओंजळीने चेहर्‍याला झाकणे.

भाव डोळ्यातील सारे सांगुनी गेले मला;
ते निरोपाच्या क्षणी मागे जरासे थांबणे.


     < <<----Back to INDEX <<<----अनुक्रमणिका <<<----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा