पाच गझला_मयुरेश साने



१.

दुखः मी तोलू कशाला?
आसवे जोडू कशाला?

भंगलेले मन बघाया;
आरसे शोधू कशाला?

मी तसा निर्दोष सुटतो;
कायदे मोडू कशाला?

उंबरे माझेच सारे;
गाव मी सोडू कशाला?

शब्द माझा शब्द आहे;
नाव मी खोडू कशाला?

तोच जर माझ्यात आहे;
हात मी जोडू कशाला?


२.

हुंदक्यांनी लाख केली आर्जवे;
सारखे ओठावरी हासू हवे.

आसवांचा आडपडदा दूर कर;
एकदा बोलून घे दु:खासवे.

रंगलो नाही कधी जागेपणी;
कोण देतो रंग स्वप्नांना नवे.

छाटल्या फांद्या निराशेच्या किती;
एवढेसे सूख आता पालवे.

संप,दंगा,घोषणा झाल्या सुरू;
जो इथे खाईल त्याला खवखवे.

लोक सारे वाटती आता मला;
पारधी निवडून देणारे थवे.

लाट प्रेमाची नसे साधीसुधी;
बेट प्रेमाचे तिलाही जाणवे.

विसरणे असते तसे सोपेच पण
नेमक्या वेळी नको ते आठवे.

३.

कोणत्या बागेतुनी येशी सुवासा;
टाकला कुठल्या फुलांनी हा उसासा.

रान होते लाख चकव्यांचे तरीही;
पाय वाटेचा मला होता दिलासा;

दाटते ह्रदयात जे ते ओघळू दे;
भार झाला हा;अबोल्याने खुलासा.

शेवटी हातात उरते एकटेपण;
आठवांना पाहिजे तितके तपासा.

साद असते ती मला तू घातलेली;
दाद घेतो मैफली मधला तुझा सा.

काय घडते सांगना ठरल्या प्रमाणे;
हाय दैवाचा कसा उलटाच फासा.

बरस तू किंवा कधी बरसू नको पण
भाकरीचा देत जा तुकडा जरासा;

मी कसा आहे मला ठाऊक नाही;
मी जसा आहे तसा दिसतो जरासा.

४.

तुझे तुला तू उमलत ठेव;
भले मला तू झुलवत ठेव.

तुझा चेहरा दे गाण्याला;
तुझी देखणी हरकत ठेव.

वजीर होइल नशीब तुझे;
सध्या प्यादे सरकत ठेव.

तोल मनाचा ढळू न देता;
खुशाल पाउल घसरत ठेव.

अर्थ तुझ्या ओळीला येइल;
अक्षर अक्षर गिरवत ठेव.

मरणानेही व्याकुळ व्हावे;
जीव जिवाला जडवत ठेव.

५.

कितीदा टाळली स्वप्ने;
तरी रेंगाळली स्वप्ने.

कशाला रातराणीने;
उगाचच माळली स्वप्ने.

मला शोधू नका कोणी;
मला कंटाळली स्वप्ने.

जरासा मोकळा झालो;
जराशी ढाळली स्वप्ने.

पुन्हा मी रात्र पांघरली;
उरी कवटाळली स्वप्ने.

मला तू टाळले तेव्हा;
किती ओशाळली स्वप्ने.


     < <<----Back to INDEX <<<----अनुक्रमणिका <<<----



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा